पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे यांना ज्या कारणासाठी पदमुक्त करण्यात आले, ते कारण पाहता, विद्यापीठातील परीक्षेचे काम करण्यासच कुणी उत्सुक राहील किंवा नाही, अशी चिंता प्राध्यापकवर्गात निर्माण झाली आहे. एका विद्यार्थ्यांला जास्त गुण दिले, या कारणास्तव प्रा. बर्वे यांचे विभागप्रमुखपद काढून घेण्यात आले. प्राध्यापकावर अशा प्रकारे करण्यात आलेली ही बहुधा पहिलीच कारवाई आहे. यामागे जातीय शक्तींचा हात असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी एका विद्यार्थ्यांने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या आधारे विद्यापीठाने सत्यशोधन समिती नेमली. या समितीनेही प्रा. बर्वे यांना दोषी ठरवले. झालेली चूक लक्षात येताच ती दाबून टाकण्याचा प्रयत्न न करता त्याबाबत विद्यापीठाला त्वरित कळवण्यात आले असतानाही, त्याचा कोणताही विचार सत्यशोधन समितीने केला नाही, असे दिसून येते.
असा प्रकार हा मानवी चूक या सदरात मोडतो. विद्यापीठात दरवर्षी होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांबाबत अशा घटना अनेकदा घडत असतात. त्या वेळीच दुरुस्तही करण्यात येतात. मात्र चूक मान्य केल्यानंतरही शिक्षेस पात्र ठरवण्यामागे अन्य काही हेतू असल्याची शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.
पुणे विद्यापीठातील काही अधिसभा सदस्यांनी प्रा. बर्वे यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी विभागात येऊन गोंधळही घातला होता. विद्यापीठाच्या एका विभागाच्या प्रमुखाला विद्यापीठाचेच सदस्य अशा प्रकारे वागणूक देत असताना, विद्यापीठाने मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचीही चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन गुण वाढविल्याचे प्रकरण नुकतेच गाजले होते. संबंधितांवरील पोलीस कारवाई अद्याप सुरू आहे. एखाद्या विभागप्रमुखाला अशा कारणासाठी जर पदमुक्त करण्यात येत असेल, तर भ्रष्टाचार करून गुण वाढवणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायला हवी, असा प्रश्न विद्यापीठातील एका जबाबदार अधिकाऱ्यानेच उपस्थित केला आहे.
प्रा. उज्ज्वला बर्वे यांना केवळ प्रमुखपदावरून दूर करण्यात आले आहे, त्यांचे अध्यापकपद मात्र तसेच आहे, असा खुलासा विद्यापीठातर्फे करण्यात येत असला, तरी ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली, त्यावरून त्यामागे अन्य काही शक्ती कार्यरत असल्याची शंका निर्माण होते.