कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात झालाच नाही

राज्य सरकारमध्ये अनागोंदी कारभार सुरु असून सरकार फक्त घोषणाबाजी करुन लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात झालाच नसून शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

येथे रविवारी विखे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा विखे यांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत विखे यांनी राज्यात सामाजिक दुही निर्माण करुन  सत्ताधाऱ्यांकडून आपले अपयश झाकण्याचे काम सुरु असल्याची टीका केली. आघाडी सरकारच्या काळातील योजनांची नावे बदलून त्याच योजनेचे वितरण करण्याचा सपाटा सरकारने लावला असून सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. राज्यात तीन वर्षांत १७ हजार मुलांचा कुपोषणाने मृत्यू झाला असला तरीही सरकार मात्र त्याची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेत त्यांनी नगर पालिकेची  विकास कामे राज्यातील इतर स्थानिक संस्थांना अनुकरणीय असल्याचे नमूद केले.

यावेळी पालिकेच्या रुग्णालयातील क्ष किरण केंद्र, सोनोग्राफी सेंटर, ईसीजी सुविधा अशा विविध आरोग्य सुविधा केंद्राचे प्रारंभी विखे यांनी उदघाटन केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते नविन व्यापारी संकुलातील डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम इ वाचनालयासह शिवाजी नाटय़ मंदीराशेजारील जागेत बांधण्यात आलेल्या दादासाहेब बटेसिंग उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.

विखे यांच्या हस्ते सुवर्ण नागरी जयंती योजनेअतंर्गत विविध बचत गटांना धनादेश आणि प्रशिक्षित महिलांना शिवणयंत्र आणि ब्युटी पार्लरसाठी लागणाऱ्या खुर्चीचे वाटप करण्यात आले. बटेसिंग रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने त्यांच्या समाधी स्थळावर जावून विखे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. सीबी संकुलात उभारण्यात आलेले वॉटर पार्क आणि उद्यानाची त्यांनी पाहणी केली. कार्यक्रमास सुरुपसिंग नाईक, कुणाल पाटील, काशीराम पावरा, डी. एस. अहिरे, सुधिर तांबे, के. सी. पाडवी आदी आमदार उपस्थित होते.