|| प्रशांत देशमुख

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन;  महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा सुवर्ण महोत्सव

आरोग्याचा प्रश्न ही भारतापुढील एक प्रमुख समस्या असून विविध आरोग्य सेवांद्वारे त्याला तोंड देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता रामनाथ कोविंद, आयोजक संस्थेचे अध्यक्ष धीरुभाई मेहता उपस्थित होते.

या वेळी राष्ट्रपती कोविंद यांनी देशापुढील आरोग्यविषयक बाबींचा ऊहापोह केला. ते म्हणाले की, देशापुढे संसर्गजन्य व्याधी, नवनवे आजार व उन्नत होणाऱ्या व्याधींचे आव्हान समाजासमोर उभे ठाकले आहे. आरोग्य सेवेची कमतरता, कुपोषण व दुर्लक्षित व्याधींमुळे या अडचणी उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी आयुष्मान भारत व अन्य उपक्रम सरकारतर्फे  राबविले जात आहेत. आरोग्यविषयक समस्या गुंतागुंतीच्या असून त्याला सामाजिक-आर्थिक भेदाची किनार आहे. महात्मा गांधी यांचा निसर्गोपचारावर विश्वास होता. समुदाय आरोग्याचे भान ठेवणाऱ्या या संस्थेने पारंपरिक आरोग्यविषयक ज्ञानाचे संवर्धन करीत पर्यायी उपचार पद्धती विकसित करावी. या संस्थेचे कर्करोग, क्षयरोग व कुष्ठरोगावर चाललेले संशोधन परिणामकारक ठरत आहे. संस्थेने या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेशी संवाद ठेवून जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरेल, असे कार्य करावे. भारताकडे औषधी निर्माणशास्त्राचे केंद्र म्हणून पाहिले जाते. प्रत्येकाच्या डोळय़ांतील अश्रू पुसण्याचे स्वप्न बापूंनी पाहिले होते. या प्रवासात वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींनी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या ग्रामदत्तक, ग्रामीण आरोग्य विमा, सामुदायिक आरोग्य या उपक्रमांची प्रशंसा केली. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त केली. नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष धीरुभाई मेहता यांनी देशातील ४७० वैद्यकीय महाविद्यालयांपैकी सर्वोच्च असणाऱ्या तीन संस्थांमध्ये सेवाग्रामची वैद्यकीय संस्था असल्याचा उल्लेख केला.

बापू कुटीस भेट

वध्रेत आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी सर्वप्रथम बापू  कुटीला भेट दिली. आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू यांनी त्यांचे स्वागत करीत विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी श्री. व श्रीमती कोविंद यांनी अंबर चरख्यावर सूतकताई केली. बापू कुटीतल्या प्रार्थनेत ते सहभागी झाले.