डॉ. पद्मसिंह पाटील यांचाही पाठिंबा

महाभारतातील अभिमन्यूसारखी आपली अवस्था झाली आहे. चक्रव्यूह भेदण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. शरद पवार हे पूर्वीही आपले दैवत होते आणि पुढेही राहतील. मात्र जिल्ह्यतील अनेक मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक राजकारणाची गरज आहे. त्यासाठीच हृदयावर दगड ठेवून आपल्याला भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील प्रयत्न करीत आहेत. परंतु काही प्रश्न अद्याप मार्गी लागलेले नाहीत. वारंवार हे लक्षात आल्यामुळे अनेक वेळा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशीही त्यावरून संवाद साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर देखील या तिघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे. काही झारीतील शुक्राचार्य समाजमाध्यमांत चुकीच्या गोष्टी पसरवित आहेत. आज इथे परिवार संवाद मेळावा सुरू असताना मुंबईतील आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांचा कार्यक्रम सुरू आहे. राजकीय मतभेद झाले तरी यापुढे नातेसंबंध कायम राहतील. जिल्ह्यतील महत्त्वाच्या प्रश्नांवरून आपण भाजप प्रवेश करीत असल्याचे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही आपण नाउमेद झालो नाही. विचित्र परिस्थितीत संघर्षांची भूमिका कायम ठेवली. त्यानंतर हातातून गेलेली जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि विधानसभा निवडणूकही जिंकली. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपले राजकीय सर्वस्व पणाला लावून कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प मंजूर करवून घेतला. त्या वेळी ही बाब अनेकांना रुचली नव्हती. मागील २० वर्षांत तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. १२० किलोमीटर अंतरावरून उजनीचे पाणी उस्मानाबाद शहरात आणले. आता मोठे उद्योग जिल्ह्यत येणे गरजेचे आहे. त्यासाठी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि कौडगाव एमआयडीसी या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपण भाजपात दाखल होत असल्याचे आमदार पाटील यांनी जाहीर केले.

शिवसेनेकडून टीका

झूल पांघरलेले गाढव मित्र पक्षात दाखल होत आहेत. मित्र पक्षातील सहकारी बांधवांनी त्यापासून सावध राहावे. ही पिडा त्रासदायक आहे. त्याच्यासाठी आम्ही मित्र पक्षासोबत असणार नाही. उस्मानाबादची जागा शिवसेनेची आहे. काही झाले तरी जागा सोडणार नाही, अशा शब्दात उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशावर नाव न घेता टीकेची झोड उठवली.

आजवर आपण मोठय़ा हिमतीने आपल्या पाठीशी उभे राहिलात. त्यामुळेच मागील ४५ वर्षांत राज्याच्या आणि जिल्ह्यच्या विकासात भरीव योगदान देता आले. बदललेल्या परिस्थितीत आमदार राणा जगजितसिंह यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्याप्रमाणे आपण राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.      – डॉ. पद्मसिंह पाटील