गेल्या काही दिवसांपासून थकबाकी वाढल्याने अजिंक्यतारा सहकारी बँकेवर भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले आहेत.
ठेवीदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून ठेवी ठेवल्या आहेत. र्निबधामुळे ठेवीदारांची अडचण होणार आहे, याची जाणीव मला आहे. मात्र  सर्व ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत देण्यासाठी मी कटिबध्द आहे. एखाद्या सक्षम आणि मोठय़ा बँकेत अजिंक्यतारा सहकारी बँकेचे विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी बँकेचे चेअरमन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिध्दिपत्रकात दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून बँकेची थकबाकी वाढल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने अजिंक्यतारा सहकारी बँकेवर निर्बंधघातले आहेत. यामुळे १ हजाराच्या वर रक्कम काढता येणार नाही. नवीन ठेव घेता येणार नाही. नवीन कर्ज वाटप आणि कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. कर्जवसुलीत मी स्वत लक्ष घातले असून कोणालाही सुट न देता कर्जवसुली गतीने सुरू आहे. त्यामुळे लवकरात लकवर कर्जवसुली करून ठेवीदारांच्या ठेवी लवकर परत करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे.
बँकेकडे ७२ कोटीच्या ठेवी होत्या. काही ठेवीदारांच्या ठेवी परत केल्यानंतर ५७ कोटी ठेवी असून ४१.७५ कोटी कर्ज आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल १० कोटी कर्जवसुली करण्यात आली आहे. वसुलीसाठी दोन स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहे. बँकेची गुंतवणूक १२ कोटी ९२ लाख रुपये असून भागभांडवल २ कोटी ६८ लाख तर राखीव निधी ५ कोटी ३३ लाख रुपये आहे.
बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सर्वाची क्षमा मागतो. लवकरात लवकर वसुली करून सर्वाच्या ठेवी परत करण्यासाठी मी कटिबध्द आहे. तसेच येत्या काही दिवसांत बँकेचे विलीनीकरण होईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.