पावसाळ्यात केळवे गावात समुद्राचे पाणी शिरण्याचा धोका; ३० एकर बागायती जागा नष्ट

पालघर : अडीच किलोमीटर लांबीच्या केळवे समुद्रकिनाऱ्याच्या निम्म्या भागाची धूप होत आहे. त्यामुळे येथील निसर्गरम्य किनाऱ्यावरील सुरुची झाडे कोसळू लागली आहेत. किनाऱ्याच्या उत्तरेला २५ ते ३० एकर मालकी जमीन समुद्राच्या पाण्याने व्यापली आहे. लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या गावातील किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना न केल्यास गावाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबईपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटन स्थळाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही बाजूला खाडी पात्र असून खाडीपात्रात जवळील पाचशे ते सातशे मीटरचे अंतरामध्ये गेल्या काही वर्षांपासून समुद्राची धूप वाढली आहे. सुभाष पाडा येथील सागरी पोलीस ठाण्यापासून मांगेल आळी जेटीच्या दरम्यान तसेच टेट्रापोल बंधाऱ्यापासून उत्तरेला दादरपाडा भागात समुद्र किनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात धूप होत आहे. दादरपाडा भागात होणारी किनाऱ्याची धूप रोखली न गेल्यास समुद्राचे पाणी गावातील प्रमुख वस्तीत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांच्या खाडीचा प्रवाह बदलत राहिल्याने या परिसरात असलेली स्थानिकांची सुमारे ३० एकर बागायती जागा समुद्राच्या पाण्याखाली गेली आहे.

पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी शासन मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करत असला तरी केळवा समुद्र किनारी १०० मीटरच्या टेट्रापोल बंधारा बांधण्यासाठी २०१३-१४ मध्ये उभारण्यात करण्यात आला होता. सद्यस्थितीत सुभाष पाडा स्मशानभूमीलगत सहाशे मीटरचा वाळू बंधारा उभारण्याचे काम सुरू आहे. वाळूने भरलेल्या ‘प्लास्टिक पॉलीमर’ गोणी (जिओ बॅग) उपलब्ध होण्यात मर्यादा येत आहेत. याशिवाय मजूर कामावर येत नसल्याने या बंधाऱ्याची जेमतेम २०० मीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. बांधकाम सुरू असलेल्या बंधाऱ्या दक्षिणेच्या भागात नवा बंधारा मंजूर झाल्याचे सांगण्यात येते असले तरी याबाबत दुजोरा मिळालेला नाही. केळवे  धूप प्रतिबंधक बंधाराचे काम मत्स्य व्यवसाय विभाग तसेच पतन विभागाकडून झाले आहे. या कामांदरम्यान दोन्ही विभागांत समन्वय नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पर्यटन व्यवसाय मंदावण्याची भीती

दादरपाडा परिसरात लाटांचा जोर वाढल्याने त्याठिकाणी पूर्वी बांधलेला दगडी धूप प्रतिबंधक बंधारा जमीनदोस्त झाला आहे. समुद्राच्या उधाण रोखण्यासाठी शिल्लक असलेले काही मीटर रुंदीचा नैसर्गिक किनाऱ्याचा पट्टा लाटांमुळे फुटला आहे, तर गावातील अधिकतर भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. केळवे गावातील समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी शासनाने सातपाटी गावाप्रमाणे विशेष लक्ष द्यावे, असे येथील ग्रामस्थांची आणि पर्यटन व्यावसायिकांची मागणी आहे. किनाऱ्याची धूप अशीच कायम सुरू राहिल्यास येथील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.