पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिवलला सनातन संस्थेने विरोध केला आहे. सनबर्नकडून करचुकवेगिरी केली जात असल्याचे, सनबर्न फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आरोप सनातन संस्थेकडून करण्यात आले आहेत. पुण्यातील केसनंदमध्ये २८ डिसेंबरपासून सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेने सनबर्नला विरोध केला असला तरी राज्याच्या पर्यटन विभागाने या फेस्टिवलला पाठिंबा दिला आहे.

‘संतांच्या भूमीत नंगानाच होऊ देणार नाही,’ अशी भूमिका सनातन संस्थेने घेतली आहे. यासाठी सनातन संस्थेकडून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘याआधी गोव्यात सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका तरुणीचा अंमली पदार्थाच्या सेवनाने मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांनी जबाबदारी झटकली होती. त्यामुळे या फेस्टिवलचे आयोजित करताना यामधील कोणत्याही अनुचित प्रकारासाठी आयोजकच जबाबदार असतील, हे लिखित स्वरुपात कबूल करुन घ्या,’ असे सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

याआधी अनेकदा गोव्यात सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सनबर्नच्या आयोजकांनी गोवा सरकारला कर न भरल्याचा आरोपदेखील सनातनकडून करण्यात आला. मात्र गोवा सरकारला कर भरण्यात आल्याचे सनबर्नच्या आयोजकांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात अंमली पदार्थांचे सेवन केले जात नसल्याचेदेखील आयोजकांनी म्हटले आहे. सनबर्नविरोधात अंमली पदार्थांसंबंधित अद्याप एकही गुन्हा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेला नाही.

दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. खाद्य, संगीत आणि मनोरंजन ही सनबर्न फेस्टिवलची संकल्पना आहे. गोव्यात २००७ मध्ये पहिल्यांदा सनबर्नचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबरपासून पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अडीच ते तीन लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. सनबर्न फेस्टिवलच्या एका तिकीटाची किंमत दोन हजार रुपये आहे.