दिगंबर शिंदे

काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य मोडून महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंयाचत समित्या आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळालेल्या भाजपने सांगली जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असून, लोकसभेबरोबरच जिल्ह्यातील विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपने हे सारे अधोरेखित केले.

यश मिळाल्यावर पक्षांतर्गत नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढते. त्यातून अंतर्गत संघर्ष सुरू होतो. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना पक्षांतर्गत पातळीवरून संघर्ष करावा लागला आहे, यापेक्षा त्यांचे पक्षातील अन्य नेत्यापेक्षा विरोधकासोबतच चांगले जमते असा समज भाजपच्या कुजबुज यंत्रणेने पसरविला आहे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे वालचंद महाविद्यालयावर मालकी कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी थेट अध्यक्षपद स्वीकारत खासदार पाटील यांना देशमुखांना आव्हान दिले. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडत असताना पक्षांतर्गत बंडखोरीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. बाजार समिती, जिल्हा बँकेत राष्ट्रवादी, काँग्रेसशी चांगले मिळतेजुळते घेत असताना पक्षात आपला पाय भक्कम करण्याचे प्रयत्न केले, निष्ठावान गटाला मागे सारून पक्षावर प्रभुत्व कधी निर्माण केले हे कळत असताना दिल्लीची गरज म्हणून निष्ठावान गटाकडून दुर्लक्षच केले गेले. अशा प्राप्त स्थितीत पक्षाकडून उमेदवारी मागण्यापेक्षा आपली मुंबईलाच पसंती असल्याचे दर्शवीत कवठेमहांकाळ-तासगाव मतदार संघातून विधानसभा लढविण्याची तयारी केली. यासाठी अजितराव घोरपडे यांचे पंख कापण्याचे प्रयत्न करीत आपला स्वत:चा गट तयार केला.

आपला गट मजबूत करीत असताना बांधणी करीत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी अस्पृश्य आहेत असे न मानता  अथवा त्यांची भाजपालाच केवळ मदत होईल असे न पाहता केवळ काका गट कसा मोठा होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले गेले. खासदारकीऐवजी विधानसभेची त्यांची तयारी सुरू असल्याचे  लक्षात येताच पक्षाने वालचंदबाबत मवाळ धोरण स्वीकारण्याबरोबरच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन कॅबेनेट दर्जाही दिला. यामागे फडणवीस यांची गरज  नसून दिल्लीची गरज समोर आली. यातूनच त्यांच्या इच्छेपेक्षा पक्षाचीच गरज म्हणून नागजचा मेळावा आयोजित करण्यात आला. खासदारांनी झाले-गेले कृष्णार्पण करून दिल्लीसाठी मोच्रे बांधणी सुरू केली. आपल्याकडे कार्यकर्त्यांचे आजही मोहोळ आहे हे रविवारच्या मेळाव्याने दाखवनू दिले. यासाठी सांगली-मिरजेतील मदनभाऊ गटाचे कार्यकत्रे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे कार्यकत्रेही ऐनवेळी महत्त्वाचे ठरले.

नागज आणि रेड येथे  झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजना रखडण्यास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा पुन्हा  एकदा आरोप केला. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सिंचन घोटाळयातील हजारो कोटी गेले कुठे? असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादीला घायाळ करण्याची संधी साधली होती. चार वष्रे सत्ता उपभोगत असताना या सिंचन घोटाळ्याचे नेमके काय झाले? पसे कुणी हडप केले हे सांगण्याची संधी जनतेने दिली असतानाही पुन्हा तोच विषय चच्रेच्या मध्यभागी आणून मुख्यमंत्री जुन्या पानावरून पुढे हेच  सांगण्याचा प्रयत्न सांगलीत  करीत होते. संधी देऊनही यातील लोकांना गजाआड करण्याची िहमत झाली नाही की, डोंगर पोखरून उंदीरही हाती लागला नाही याची स्पष्ट कबुली दिली हे समजायला मार्ग नाही. मात्र सिंचन घोटाळा अजूनही राष्ट्रवादीची पाठ सोडायला तयार नाही हे आता स्पष्ट झाले.

शिराळा मतदार संघातील आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करीत असताना मंत्रीपदाची संधी देण्याचा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. ज्या ज्या वेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होते, त्या त्या वेळी नाईकांचे नाव अग्रभागी असते, जिल्हयाचा सत्तेतील अनुशेष नाईकांना संधी देऊन भरला जाईल असे खाजगीत पक्षाचे नेते सांगत आले. मात्र ते गडकरी गटाचे असल्यानेच पहिल्या टप्प्यात त्यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याचे सांगितले जाते. असे असताना गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना वाकुर्डे योजनेच्या उद्घाटनाला पुन्हा मीच असणार आहे असा निर्वाळा देत त्यांनी गडकरी यांनाही एकप्रकारे राज्याचे पुढचे नेतृत्वसुद्धा माझेकडेच असेल असे सुचविले असावे.

संजयकाका पाटील हेच लोकसभेचे उमेदवार राहतील असे पक्षानेही सुचविले असून राज्यातही कार्यरत राहण्याच्या बोलीवर काकांनीही खासदारकीची निवडणूक लढविण्याची मानसिकता आणि पक्षाची गरज पूर्ती करण्याचे वचनपूर्ती मेळाव्याच्या निमित्ताने सांगितले. तर पक्षातून बेदखल केलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या होत असलेल्या जहरी टीकेचा समाचार घेत असताना संजय पाटील यांनी वेळ येताच दाखवून देण्याची धमकीही मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत देऊन आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण!

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तासगावला येण्याचे निमंत्रणही खासदारांनी दिले आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात या दोघांचा तासगाव दौरा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे प्रयोजन यामागे आहे. यानिमित्ताने कवठेमहांकाळनंतर तासगाव या घरच्या मदानावर पुन्हा एकदा गर्दीचा खेळ मांडला जात असून यात पक्षांतर्गत विरोधकांनाही आपल्याविना पर्याय नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न असेल.