News Flash

सत्य समोर येईल; राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर गृहमंत्री देशमुखांनी सोडलं मौन

राऊतांनी अनिल देशमुख यांच्यावर साधला होता निशाणा

सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वादात सापडले आहेत. देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे सरकारही अडचणीत आले होते. या वादावर फोन टॅपिंग प्रकरणामुळे पडदा पडण्याची चिन्हं असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. राऊत यांच्या भाष्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी मौन सोडत उत्तर दिलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटींची वसूली करण्यास सांगितलं होतं, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठा राजकीय धुरळा उडाला. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देशमुख यांना रोखठोक सदरातून सवाल उपस्थित केला होता. त्याची चर्चा सुरू असताना देशमुख यांनी प्रकरणावर भाष्य केलं आहे.

“माजी पोलीस आयुक्तांनी माझ्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व आरोपांची चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे, ते समोर येईल” , असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून देशमुख यांना सल्ला वजा टोला लगावला होता. “देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?,” असा टोला राऊत यांनी गृहमंत्री देशमुख यांना लगावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 3:13 pm

Web Title: sanjay raut rokhthok retired high court judge to probe corruption charges against me says anil deshmukh bmh 90
Next Stories
1 पं. नाथराव नेरळकर यांचे निधन; मराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला
2 “महाराष्ट्रात सरकार उद्धव ठाकरेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?”
3 ‘बुरा न मानो होली है’ म्हणत संजय राऊतांचं खास ट्विट; निशाणा नेमका कुणावर?
Just Now!
X