ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची कोल्हापूरमधील त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली आहे. कृष्णा किरवले म्हाडा कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. किरवले यांच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानंतर सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीने क्षुल्लक कारणातून किरवलेंची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि कार्यकर्ते असलेल्या डॉ. कृष्णा किरवले यांची दुपारी हत्या झाली. शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या किरवले यांच्या घरात त्यांच्यावर चाकून हल्ला करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रमुख अशी पदे किरवले यांनी भूषवली होती. काही महिन्यांपूर्वीच ते विद्यापीठातून निवृत्त झाले होते.