काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर शरद पवार यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. यावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करतायत. शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं.” बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपलं मत मांडलं.

यावेळी बोलत असताना पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असंही थोरात म्हणाले. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी…महाराष्ट्रातलं सरकार टीकवायचं असेल तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करणं टाळा असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधली ही धुसफूस किती काळ चालते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.