शयनयान सेवेला प्रवाशांची नापसंती

एसटी महामंडळाने भाडे कमी केल्यानंतरही वातानुकूलित शिवशाही स्लीपर (शयनयान) बसकडे प्रवाशांनी पाठच फिरवली आहे. मात्र तरीही खासगी बस गाडय़ांच्या तुलनेत जास्तच असलेले भाडे, दुष्काळी भागातही स्लीपरसारखी महागडी सेवा अशा काही कारणांमुळे सध्या सुरू असलेल्या ४२ पैकी १० मार्गावरील शिवशाही स्लीपर बस सेवा गुंडाळावी लागली आहे. या १० मार्गामध्ये सात मार्ग हे मुंबई सेन्ट्रल, बोरिवलीतून सुटणाऱ्या बस सेवांचे आहेत. .

खासगी बस गाडय़ांशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने राज्यात ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही स्लीपर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल २०१८ रोजी पहिली स्लीपर बस पुणे-शिरपूर मार्गावर धावली. त्यानंतर स्लीपर बस गाडय़ांचा विस्तार केला गेला. ४२ मार्गावर ८८ स्लीपर बस गाडय़ा धावू लागल्या. मात्र खासगी बस गाडय़ांपेक्षाही एसटीच्या स्लीपर बस गाडय़ांचे असलेले जादा भाडे यामुळे अवघे पाच टक्के भारमान मिळू लागले. प्रत्येक बसमागे पाच ते सहाच प्रवासी मिळत असल्याने एसटी महामंडळाला तोटा होऊ लागला. अखेर महामंडळाने स्लीपर बसच्या भाडय़ात १४ फेब्रुवारी २०१९ पासून कपात केली. ही कपात २३० रुपये ते ५०० रुपयांपर्यंत होती.

परंतु कपातीनंतरही प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. भाडेकपातीनंतर ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी भारमान मिळणे अपेक्षित होते. मात्र हे भारमान अवघे ३० टक्क्यांपर्यंतच राहिले. त्यामुळे महामंडळाने स्लीपर बसच्या मार्गाचा आढावा घेऊन त्या मार्गावरील सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला. ४२ मार्गापैकी १० मार्गावरील स्लीपर बस सेवा बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंद करण्यात आलेले मार्ग हे दुष्काळी भागातील आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने स्लीपर बससारखी महागडी सेवा सुरू करताना दुष्काळी भागातील जनतेचा विचार का केला नाही, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. महामंडळ दुष्काळी भागांतील मार्गावर वातानुकूलित स्लीपर बस गाडय़ा चालवत आहेत. दुष्काळी भागांतील दहा मार्ग तर बंदच करण्यात आले आहेत. आता याच मार्गावर साध्या बस गाडय़ा चालवण्याचा विचार महामंडळ करत आहे.

दरम्यान यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजिंत सिंह देओल यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

बंद करण्यात आलेले मार्ग

  • पुणे-यवतमाळ-पुणे
  • बोरिवली-उद्गीर-बोरिवली
  • मुंबई-लातूर-मुंबई
  • चंद्रपूर-औरंगाबाद-औरंगाबाद
  • मुंबई-अक्कलकोट-मुंबई
  • बोरिवली-उमरगा-बोरिवली
  • मुंबई-उस्मानाबाद-मुंबई
  • मुंबई-मेहकर-मुंबई
  • पुणे-चोपडा-पुणे
  • मुंबई-परळी-मुंबई