सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाची प्रगती मित्रपक्षांना बघवत नाही, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांची माझ्याशी चांगली मैत्री आहे. ते अतिशय शांत दिसतात, पण सिंधुदुर्गात येऊन माझ्याविरोधात टीका करतात. त्याचा समाचार राणे यांनी वेंगुर्ले या ठिकाणी घेतला. वेंगुर्ले येथे ‘आम्ही वेंगुल्र्याचे’ पर्यटन महोत्सव समिती व सिंधुदुर्ग गाइड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन महोत्सवात पालकमंत्री नारायण राणे बोलत होते. या वेळी सिंधुदुर्ग गाइडचे संस्थापक नितेश राणे, जि. प. अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आदी उपस्थित होते. गृहमंत्री आर. आर. पाटील यांची माझ्याशी चांगली मैत्री आहे. ते शांत दिसतात, पण सिंधुदुर्गात येऊन माझ्याविरोधात टीका करतात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी प्रगतिपथावर नेलेला सांगली जिल्हा आर. आर. पाटील यांनी खाली आणला. त्यांनी टीका करण्यापेक्षा सिंधुदुर्गच्या विकासासाठी काय केले ते प्रथम सांगावे, असे आवाहन राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाची प्रगती ही मित्रपक्षांना बघवत नाही. त्यामुळे त्यांची टीका सुरूच असते. राष्ट्रवादी आमदार दीपक केसरकर यांचाही समाचार नारायण राणे यांनी घेतला. ते म्हणाले, येत्या दीड वर्षांत विमानतळ, सीवर्ल्ड, बंदर विकासाच्या माध्यमातून लाखो परदेशी पर्यटक सिंधुदुर्गमध्ये येतील. जगाच्या पर्यटन नकाशावर सिंधुदुर्गचे नाव जावे म्हणून मी सातत्याने प्रयत्न करीत असतो.
‘आम्ही वेंगुल्र्याचे’ या पर्यटन महोत्सवाच्या आयोजनाचे प्रयोजन पर्यटन महोत्सवातून व्यवसायाचे प्रबोधन व्हावे, असे आहे, असे राणे म्हणाले. या वेळी सिंधुदुर्ग गाइडच्या माध्यमातून आयोजित महोत्सवाचे विवेचन नितेश राणे यांनीही केले. ‘आम्ही वेंगुल्र्याचे’ पर्यटन महोत्सवातून सांस्कृतिक व पर्यटन प्रबोधनाचे उपक्रम हाती घेण्यात आले होते.