गानकोकीळा लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. त्या आता घरी परतल्या आहेत. स्वतः त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. शिवाय सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत. लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते.

रविवारी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून यांची माहिती दिली. “नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. मी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभार आहे. हे प्रेम आणि आशिर्वाद असाच रहावा,” असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

लता मंगेशकर यांनी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरचेही आभार मानले आहेत. “माझ्यावर काळजीपूर्वक आणि प्रेमानं उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार. डॉ. प्रतीत समधानी, डॉ. अश्विनी मेहता, डॉ. झरीर उदवाडीया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निंबाळकर आणि डॉ. राजीव शर्मा या डॉक्टरांविषयी लता मंगेशकरांनी आभार व्यक्त केले आहेत.