कांद्याची भाववाढ सुरूच असून, शुक्रवारी प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ३०० रुपये भाव मिळाला. देशभरातील अतिवृष्टीमुळे भाववाढ सुरूच असून, भावाची वाटचाल ५ हजार रुपयांकडे सुरू झाली आहे. त्यामुळे आता मुंबई, पुणे, दिल्ली आदी मोठय़ा शहरात कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणार आहे.
नगर जिल्ह्य़ातील राहाता, राहुरी व घोडेगाव येथील बाजार समित्यांच्या आवारात शुक्रवारी कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार २५० रुपये भाव मिळाला. राहुरी येथे १८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. १०० गोण्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला ४ हजार ३०० रुपये भाव निघाला. सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपये असा भाव होता. घोडेगाव येथील बाजारात ४ हजार २५० रुपये भाव होता. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भागात अतिवृष्टी झाल्याने लाल कांदा शेतातच सडला. त्यामुळे भाववाढ सुरू झाली आहे.
यंदा राज्यात गावरान कांद्याचे उत्पादन कमी झाले. लाल कांद्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्य़ांत पुरेसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे लागवडी झाल्या नाहीत. गावरान कांद्याचे रोप टाकायला अजून अनेक भागांत पाणी नाही. त्यामुळे डिसेंबपर्यंत केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप केला नाही तर भाव चढेच राहतील. बाजारात सरकारी हस्तक्षेप झाला नाही, तर कांदा पाच हजारांच्या पुढेही वाटचाल करील असा अंदाज आहे.  सरकारने कांदा आयात करायचा ठरवला तरी त्याचा दर्जा चांगला नसतो. यंदा पाकिस्तानातही काही भागांत अतिवृष्टी झाल्याने तेथील कांदा खराब झाला आहे. चीनचा कांदा काळसर रंगाचा असतो. आतादेखील चीनचा कांदा आयात करायला व्यापारी तयार होणार नाहीत. त्यामुळे नवीन कांदा येईपर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याचे भाव टिकून राहतील. त्यात हजार ते दीड हजार रुपये कमी जास्त होऊ शकेल, असाही अंदाज आहे.

मनमाडला चार हजार १४१ रुपये
मनमाड
टंचाईमुळे यंदा उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाल्यामुळे त्याचा आवकवर परिणाम झाला असून, त्यामुळे कांद्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी मारली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुक्रवारी कांद्याने चार हजारांचा टप्पा ओलांडला. कांदा ४१४१ रुपये प्रतिक्विंटल भावाने विकला गेला. देशांतर्गत कांद्याला मागणी वाढल्याने सध्या भाव वाढले आहेत.
कांदा उत्पादकांकडील चाळीत साठवणूक केलेला कांदा अत्यल्प प्रमाणात असल्याने तसेच मागील वर्षी टंचाईमुळे कांद्याचे उत्पादनही अतिशय कमी झाले. परिणामी सध्या दिवसेंदिवस भाव वाढत आहेत. शुक्रवारी येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची सुमारे ८०० क्विंटल आवक झाली. भाव २०१७ ते ४१४१ रूपयांपर्यंत राहिले. सरासरी ४०४० रुपये क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. एकाच दिवसात कांद्याच्या दराने क्विंटलमागे ८०० रुपयांची उसळी घेतली. नाशिक जिल्ह्य़ात उन्हाळ रब्बी कांद्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. शिवाय या भागातील कांद्याला देशात मागणीही चांगली असते. काही वर्षांपासून कमी पावसाचा फटका कांद्याच्या उत्पादनाला बसत आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याची आवक कमी होऊन उत्पादनही घटले. त्याचा परिणाम यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बाजारपेठांमधील कांद्याच्या आवक होण्यावर झाला आहे.