-मंदार लोहोकरे

भाजपा आणि मित्र पक्षाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला होता. पंढरपूर येथे रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला, तर पंढरपूर येथील नामदेव पायरी येथे आमदार सदाभाऊ खोत यांनी पांडुरंग चरणी दुग्धाभिषेक केला. हे सरकार आंधळे, मुके आणि बहिरे आहे, बा विठ्ठला सरकारला बुद्धी दे अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

दुधाला ३० रुपये दर मिळावा, प्रती लिटर दुधाला १० रुपये अनुदान द्यावे यासह इतर मागण्यासाठी आज महायुतीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचे पडसाद रात्रीपासून पंढरपूर येथे उमटू लागले. पंढरपूर – मंगळवेढा आणि पंढरपूर – सातार रस्त्यावर टायर जाळण्याची घटना घडली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी आणि दुधाला भाव द्या अशा घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे  सदाभाऊ खोत यांनी अनोखे आंदोलन केले.

आणखी वाचा- करोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

महायुतीचे नेते व रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत हे शनिवारी सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत  पंढरीच्या विठुरायाच्या चरणी दुधाचा अभिषेक घातला. या वेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के आदी उपस्थित होते.

आणखी वाचा- सांगली : इस्लामपूरमध्ये दुधाच्या गाड्या अडवून गरिबांना दूध वाटप

राज्यामध्ये रोज १ कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. ६० लाख लिटर दूध पिशवी बंद मध्ये विक्री होत आहे. ५० लाख लिटर दूध अतिरिक्त असून त्याची दूध भुकटी तयार केली जात आहे.२०१८ साली ज्यांनी आंदोलन केले ते आता सरकारमध्ये आहेत. हे सरकार मुके,आंधळे आणि बहिरे असल्याची टीका खोत यांनी केली. बा … विठ्ठला या सरकारला बुद्धी दे असे साकडे खोत यांनी घातले.