नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मानवत तालुक्यातील इरळद येथील शेतकरी सदाशिव शंकरराव खरात (वय ४४) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गारपिटीने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान ९० टक्क्यांपेक्षा अधिक असताना महसूल प्रशासनाने प्रत्यक्षात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी नुकसानीचे पंचनामे केले. त्यामुळे मोठय़ा संख्येने शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला. इरळद येथील सदाशिव खरात यांच्याकडे ६ एकर कोरडवाहू शेती आहे. गारपिटीने ज्वारीचे नुकसान झाले. डोक्यावर हैदराबाद बँक व सोसायटीचे कर्ज, यामुळे ते त्रस्त होते. शनिवारी वडिलांच्या तेरवी कार्यक्रमात गावकऱ्यांची पंगत बसली असताना सदाशिव यांनी सरळ शेत गाठले व झाडाला गळफास घेत जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.