मुरुड तालुक्यातील आठ ते दहा जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी  आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग  ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रायगड  जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यांवर गेल्या आठवडय़ापासून  ज्वालाग्रही रसायनांनी भरलेली पिंपे वाहून येत होती. गेल्या सहा दिवसांत अशा प्रकारची ५३ पिंपे आणि पाच कॅन  अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यांवर आढळून आले. या पिंपांचा  ठावठिकाणा लागलेला नसतानाच आता मुरुड तालुक्यातील वेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात आठ ते दहा जण संशयास्पदरित्या वावरत असल्याचे आढळून आले आहेत. हे सर्वजण दहशतवादी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी  जिल्ह्य़ातील श्रीवर्धन, मुरुड, रेवदंडा, दिघी, म्हसळा आणि अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू करण्यात आले आहे. लॉजेस आणि हॉटेल्सची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने १०९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.