दोन खासगी रुग्णालयांची भूमिका; अनेक रुग्णालये त्याच वाटेवर

विरार : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटनेने इतर खासगी रुग्णालयांनी कारवाईच्या भीतीपोटी कोविड उपचारातून माघार घेतली आहे. यामुळे शहरात उपचासाराठी रुग्णांना पुन्हा वणवण करावी लागणार आहे. यातील दोन रुग्णालयांनी पालिकेकडे समर्पण पत्र सदर केले, तर एका रुग्णालयाने बुधवारपासून कोविड रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

विरारमध्ये लागलेल्या करोना रुग्णालयाच्या आगीत १५ रुग्णांचा हकनाक बळी गेल्यानंतर पालिकेने रुग्णालयांना वेठीवर धरायला सुरुवात केल्याने कारवाईच्या भीतीने काही रुग्णालयांनी कोविड रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत कोविड रुग्णांवरील उपचार बंद केले आहेत. तर काही रुग्णालयांनी रुग्णांना खोटी माहिती देत स्थलांतरित करण्याचा सपाटा लावला आहे.

सध्या पालिकेच्या कोविड रुग्णालयाच्या यादीतील तीन रुग्णालयांनी माघार घेत कोविड उपचार बंद केले आहेत. यात वालीवमधील नियो रुग्णालय, वसई फाटा येथील संस्कृती रुग्णालय यांनी माघार घेतली आहे. ही दोन्ही रुग्णालय मिळून ७० खाटा कमी झाल्या आहेत. या अगोदर आगीच्या दुर्घटनेमुळे विरारमधील विजय वल्लभ ९३ खाटांचे रुग्णालय बंद पडले आहे. यामुळे रुग्णांना उपचासाराठी भटकंती करावी लागणार आहे, तर दुसरीकडे पालिकेने रुग्णालये उभारण्यास सुरुवात केली आहे. पण त्याला वेळ लागणार आहे.

 

रुग्णालयांच्या भूमिकेची कारणे

या तीन रुग्णालयांच्या वाटेवर इतरही रुग्णालये जात आहेत. सध्या खासगी रुग्णालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा प्राणवायू वेळेवर मिळत नाही, त्यात उपचारादाखल असलेल्या रुग्णाच्या प्रमाणात पुरेशा रेमडेसिविरचा साठा शासनाकडून पुरवला जात नाही. त्यात अनेक रुग्णांची बिले थकली आहेत. त्याचबरोबर सरकारी दरपत्रकाप्रमाणे रुग्ण दाखल करून घेण्याची सक्ती केली जात आहे. तसेच विमा कंपनी रुग्णाचे देयक मंजूर करत नाहीत. त्यात महापालिकेने अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे रुग्णालये मेटाकुटीला आली असल्याचे वसईचे डॉ. महेश बेळणेकर यांनी सांगितले.