22 January 2021

News Flash

राष्ट्रीय व्याघ्र गणना ५० वनक्षेत्रांत

संरक्षित क्षेत्रावर भर

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शनिवारपासून सुरुवात, व्याप्ती अडीच किलोमीटपर्यंत; संरक्षित क्षेत्रावर भर

चौथ्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेत वाघांच्या अधिवास क्षेत्रापेक्षा संरक्षित क्षेत्रावर अधिक भर देण्याचे धोरण या वेळी ठेवण्यात आले आहे. तसेच गणना अंतराची व्याप्ती दोनऐवजी अडीच चौरस किलोमीटर करण्यात आली आहे. २० ते २५ जानेवारीदरम्यान ही गणना देशभर चालणार आहे.

देशभर एकाच वेळी ही गणना होत असल्याने जीपीएस यंत्रणेचा अधिकाधिक उपयोग करीत समन्वय साधण्याचे प्रयत्न आहेत. यापूर्वीच्या तीन व्याघ्रगणनांत संरक्षित क्षेत्रातील निरीक्षण दुय्यम होते. मात्र, वाघांचा वावर संरक्षित (बफरझोन) क्षेत्रात अधिक वाढत असल्याचे गत दोन वर्षांतील चित्र वनखात्यापुढे उभे झाले. अधिवास क्षेत्रापेक्षा वाघाने संरक्षित क्षेत्रात अधिक धुमाकूळ घालून स्वत:चे अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केले. गणना करताना यापूर्वी अधिवास क्षेत्रावर दिला जाणारा भर आता मागे पडून नवा बदल झाला. तसेच रेखांकित छेदरेषा (ट्रान्झिट लाइन) आता अडीच किलोमीटपर्यंत वाढवण्यात आली आहे. ठरावीक बिटपासून गणना करताना नियुक्त कर्मचाऱ्यांची वर्दळ पाऊलखुणा मिटण्यास कारणीभमूत ठरत असे. त्यामुळे तो भूभाग सोडून वाढीव क्षेत्रापासून गणना करण्याचे सूत्र या वेळी स्वीकारण्यात आले आहे.

ही गणना वाघांची सद्य:स्थिती, व्याघ्रसंख्येतील चढउताराचे संकेत, अधिवास स्थिती, भक्ष्य उपलब्धता या विषयी विश्वसनीय निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त ठरण्याचा वनखात्याला विश्वास आहे. संपूर्ण क्षेत्रात तांत्रिक मदत काही कारणास्तव अपुरी ठरत असल्याने सगळ्या नोंदी कागदोपत्रीच केल्या जाणार आहेत.

व्याघ्रगणनेचा कार्यक्रम पूर्णत: यशस्वी करण्यासाठी  वनखात्याच्या मनुष्यबळाचा प्रभावशाली वापर करणे आवश्यक असल्याचे मत या विषयी आराखडा तयार करणाऱ्या डेहराडून येथील वाइल्ड लाइफ  इन्स्टिटय़ूटचे यादवेंद्रदेव झाला यांनी व्यक्त केले आहे. विज्ञान संस्थेकडून कदाचित अधिक विकसित पडताळणी पद्धत मांडली जाऊ शकते, परंतु अशा प्रकारे तयार केलेली पडताळणी पद्धत जोपर्यंत व्याघ्रसंवर्धनासाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रणेस (वनखाते) सामावून घेतली जात नाही, तोपर्यंत व्याघ्र संवर्धनासाठी त्याचा उपयोग होणार नसल्याचेही ते नमूद करतात. देशातील ५० वनक्षेत्रात ही गणना होणार असून महाराष्ट्रातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, सहय़ाद्री, नवेगाव-नागझिरा व बोर अभयारण्याचा त्यात समावेश आहे. या वेळी संरक्षित क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याने लगतच्या गावकऱ्यांनी मांसाहारी प्राण्यांना पाहिल्याच्या नोंदी आता अग्रभागी येणार आहेत.

गणनेती तयारी..

या गणनेत केवळ वाघांचीच मोजणी होत नाही तर तृणभक्षी प्राणी, पक्षी, झाडे-झुडपे, खोड व तत्सम सर्वाची गणना केली जाते. पहिल्या टप्प्यात मांसभक्षी प्राण्यांची गणना होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तृणभक्षी व अन्य गणना होईल. ठरलेल्या क्षेत्रात तीन ते पाच वेळा शोधमोहीम घेण्याची सूचना आहे.   वाघ व अन्य मांसाहारी प्राणी तसेच मोठय़ा शाकाहारी प्राण्यांची नोंद घेताना कर्मचाऱ्यांवर १५ किलोमीटरची वाटचाल करण्याचे बंधन आहे. शिकारी प्राण्यांनी गत तीन महिन्यात पाळीव जनावरांची हत्या केली असल्यास त्याची स्वतंत्र नोंद राखली जाणार आहे. दोन प्राणी समूहातील अंतर वीस मीटरपेक्षा अधिक असेल तर अशा समूहांची स्वतंत्र वर्गवारी केली जाणार आहे.

पुराव्यांच्या अचूकतेवर भर

वाघांची गणना करताना विविध पुराव्यांच्या अचूकतेवर भर देण्याच्या सूचना आहे. पाऊलखुणा, जुनी सुकलेली व ताजी विष्ठा, केस, हाडे, चमकणारा भाग, ओलसर व तीव्र वासाची विष्ठा अशा नोंदी ठेवतानाच घासण्याच्या खुणा,  झाडाच्या खोडांवरील दंतव्रण, ओरखडण्याची चिन्हे, प्रत्यक्ष दर्शन, आरोळी, भुंकणे व अन्य आवाज टिपले जाणार आहे. पाऊलखुणांची एक रांग म्हणजे एक ओळख खूण राहील. शिकारी प्राणी एकाच रस्त्यावर बरेच अंतर चालला असेल तर ते एकच चिन्ह धरण्यात येणार आहे. वाघीण किंवा बिबट पिल्लांसह फिरण्याची चिन्हे मिळाल्यास त्याची स्वतंत्र नोंद असेल.

नोंदी आव्हानात्मक

व्याघ्रगणनेत वनस्पती व चतुष्पाद तृणभक्षी प्राण्यांची नोंद करण्याचे कार्य वनकर्मचाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. सुका पालापाचोळा म्हणजे एक मीटर त्रिज्येच्या वर्तुळाकार खंडातील वाळलेली पाने व झाडावरून खाली पडलेल्या फांद्या होय तर सुके गवत म्हणजे एक मीटर त्रिज्येच्या वर्तुळाकार भागात पसरलेले गवत होय. दोन मीटरपेक्षा अधिक उंच म्हणजे वृक्ष तर  त्यापेक्षा कमी उंचीचे झुडुप मानले जाते. बांबूच्या अशाच उंचीवरून झुडूप व वृक्षात वर्गवारी केल्या जाणार आहे. वेली झुडूप गटात आहेत. अवैध वृक्षतोड, विभागाने कापलेली झाडे व फांद्या छाटलेली झाडे यांची वेगळी नोंद होणार आहे. सुके गवत, हिरवे गवत, लहान झुडपे, तृण, तण व उर्वरित रिकाम्या जागेची टक्केवारी नोंदविणे आवश्यक आहे. चराई गवत व बांबू कटाईची स्वतंत्र नोंद असेल. या प्रदेशात असणारा मानवी हस्तक्षेपसुद्धा टिपला जाणार आहे. चतुष्पाद तृणभक्षी प्राण्यांबाबतीत विशेष जबाबदारी घेण्याची सूचना आहे. कारण या प्राण्यांच्या विष्ठा शेळ्या-मेंढय़ाप्रमाणेच दिसतात. त्यात गोंधळ उडू नये म्हणून गणना क्षेत्रात शेळ्या मेंढय़ांची चराई होत असेल तर प्रथम त्याची नोंद करणे आणि मोठे तृणभक्षी म्हणजे हत्ती, रानगवा व रानम्हैस यांची स्वतंत्र नोंद राहणार आहे. अन्य प्राण्यांची वेगळी आकडेवारी नमूद केल्या जाईल. गणना करताना प्राण्यांस प्रत्यक्ष बघण्याची दिशा व स्वत:ची दिशा गणनकाला नोंदवायची आहे. कारण प्राण्याचा चालण्याचा मार्ग टेकडी किंवा वेगवेगळ्या दिशांचा असल्यास मोजणीत फरक पडण्याची शक्यता उद्भवते. खुरे असलेल्या या प्राण्यांच्या नोंदीसाठी किमान तीन दिवस सकाळची पाहणी अनिवार्य ठरविण्यात आली आहे. गिधाडे, मोर अशा पक्षीसमूहातील जीवांचीही नोंद या वेळी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 2:13 am

Web Title: tiger reserve in maharashtra
Next Stories
1 रायगडच्या किनाऱ्यावर अनधिकृत बांधकामांच्या लाटा कायम!
2 जळगाव नाटय़ संमेलनाला मुहूर्त मिळेना
3 पाणी नसलेल्या गावात लग्नाचाही दुष्काळ
Just Now!
X