|| विश्वास पवार

राज्यभरातील वाढत्या उष्म्याचा परिणाम,प्रतापगड, वेण्णा तलावावर गर्दी

अवघा महाराष्ट्र वाढत्या उष्म्याने होरपळत असल्याने आल्हाददायक वातावरणामुळे थंड हवेचे स्थळ महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगरदऱ्यात इथल्या झाडीत दडलेले विविध पॉईंटस, प्रतापगड, वेण्णा तलाव सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

एकीकडे उभा महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत असताना महाबळेश्वर मात्र त्याला अपवाद आहे. येथे दुपारी एखाद-दुसरा तास सोडल्यास सकाळी व सायंकाळी हवेत सुखद गारवा अनुभवण्यास मिळत आहे. परीक्षा संपल्याने व उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याने महाबळेश्वरला पर्यटकांची पावले वळत आहेत.

सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेवर, उंच जागी वसलेले हे गिरिस्थळ कायम थंडगार वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. सह्य़ाद्रीची मुख्य रांग, त्यावरील या पर्यटन केंद्रांवरील  विविध पॉईंटस,  गर्द झाडी, ऐतिहासिक स्थळांचे सान्निध्य, प्रतापगडाचा इतिहास, महाबळेश्वरची बाजारपेठ आणि मुख्य म्हणजे आल्हाददायक आणि ताजे हवामान या साऱ्यांच्या आकर्षणामुळे दरवर्षी उन्हाळ्यात इथे पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. यंदा तर महाराष्ट्रात तापमानाने टोक गाठल्याने या गर्दीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या उष्म्याने हैराण झालेले मुंबई-पुण्यासह राज्यभरातील लोक सध्या महाबळेश्वरकडे धावू लागले आहेत.

शाळांना लागलेल्या सुट्टय़ांमुळे कुटुंबासह इथे येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दोन-चार दिवसांसाठी इथे येत निवांतपणा अनुभवायचा, वेळ मिळेल तसे या भागातील विविध स्थळांना भेटी द्यायच्या, संध्याकाळी वेण्णा लेकमध्ये नौकाविहार करायचा, संध्याकाळी इथून दिसणारा सूर्यास्त अनुभवायचा, रात्री बाजारपेठेत फेरफटका मारायचा यामध्ये पर्यटक सध्या दंग झाले आहेत.