सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी राज्यातील टूर्स ऑपरेटर्ससह जिल्ह्य़ातील व्यावसायिक अशा सुमारे १५० जणांची पर्यटन परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १९, २० व २१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोकणचे पर्यटन महाराष्ट्रातील टूर्स ऑपरेटर्सनी पाहून जिल्ह्य़ाच्या विकासाला हातभार लावावा, असा या मागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या विद्यमाने कोकण पर्यटन परिषद १९, २० व २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन १९ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. बॅ. नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे होईल, असे चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष राम भोगले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या वेळी आमदार दीपक केसरकर, नितीन वाळके, उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते.
राज्यातील ७० टूर्स ऑपरेटर्सनी नोंदणी केली आहे, तसेच जिल्ह्य़ातील ४० व्यावसायिक बंधूंसह सुमारे १५० जण पर्यटनाच्या या परिषदेत सहभाग घेतील, असे सांगताना राम भोगले म्हणाले, १९ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. उद्घाटन, त्यानंतर आंबोली भेट, २० जानेवारी रोजी तारकर्लीसह जिल्ह्य़ातील पर्यटन पॉइंट आणि २१ जानेवारीला देवगड पर्यटन स्थळे व तेथे समारोप होईल. कोकणच्या पर्यटन विकासासाठी चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने पर्यटन व्यावसायिक सर्वसंबंधितांना एकत्रित आणून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. या पर्यटन परिषदेत येणाऱ्या सर्वाना हॉटेल, बीच, किल्ला, रेस्टॉरंट व पायाभूत सुविधा दाखविणार आहेत, तसेच सिंधुवैभव ही ३० मिनिटांची फिल्मही दाखविली जाणार आहे, असे राम भोगले म्हणाले. सिंधुदुर्गच्या पर्यटनाची संक्षिप्त माहिती असणारी माहितीपुस्तिकाही दाखविली जाईल. २० जानेवारी रोजी तारकर्ली येथे जाणार आहेत. टूर्स ऑपरेटर्सना सिंधुदुर्गची माहिती दिली जाईल. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री रणजीत कांबळे व सर्व संबंधित मुंबईत पार्लमेंटरी पर्यटन समिती येणार असल्याने उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याने राम भोगले म्हणाले. राज्यातील ७० टूर्स ऑपरेटर्सनी परिषदेत येण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी ६० जण येतील व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ४० जण व्यावसायिक सहभागी होतील. आमदार दीपक केसरकर, आमदार प्रमोद जठार यांच्यासह सर्वानी सहकार्य केले असून, या पर्यटन परिषदेत व्यावसायिक जागरूकता निर्माण करून त्यांना एकत्रित आणण्याचा उद्देश आहे, असे  भोगले म्हणाले.  सिंधुदुर्ग पर्यटन पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्रुटीच्या स्वरूपात जाऊन तसे चित्र उभे राहू नये म्हणूनच राजदूतांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. उलट राज्यातील टूर्स ऑपरेटर्स पर्यटनाचे सौंदर्य सर्वासमोर नेतील, अशी अपेक्षा आहे, असे राम भोगले म्हणाले. पर्यटन विकास वेबसाइट विकसित केली आहे. त्यात पर्यटक बुकिंग करू शकतात. त्या माध्यमातून सिंधुदुर्गचे पर्यटन जगभरात जाईल, असा विश्वास नितीन वाळके यांनी व्यक्त केला. कोकण पर्यटन परिषद आयोजन समितीचे आमदार दीपक केसरकर म्हणाले, कोकणातील सागरी पर्यटनात मच्छीमारांना मोठा वाव दिला गेला पाहिजे. त्यासाठी सीआरझेड शिथिलता हवी. बीच टुरिझमसाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात, असे त्यांनी सांगून पायाभूत सुविधांसाठी सरकार प्रयत्नशील आहे, तसेच पर्यटन जिल्ह्य़ासाठी खास आर्थिक तरतूद व्हावी, अशी आपली मागणी आहे, असे आमदार केसरकर म्हणाले.