तुळजापूर येथे ५० वर्षांपूर्वीच्या बलगाडय़ांनी भरणाऱ्या यात्रेने आता मात्र आधुनिक स्वरूप धारण केले आहे. ‘बलगाडी ते ऑनलाइन’ असा लक्षवेधी भक्तिभाव दिवसेंदिवस वाढत असून, दर्शनास आलेला भाविक चार तासांतच परतू शकतो, असे चित्र आहे.
तुळजाभवानी देवीची यात्रा प्राचीन काळापासून भरविली जाते. शारदीय नवरात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. देशभर ९ दिवस व रात्र देवीची आराधना केली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत भरणारा नवरात्र सोहळा भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीने लगबगीचा होतो. कोल्हापूर, तुळजापूर, वणी, माहूर या शक्तिपीठांत भाविकांची गर्दी उसळते. या सर्वच तीर्थस्थळी ५० वर्षांपूर्वी भरणारी यात्रा बलगाडय़ांतून येऊन भरत असे. कुटुंबातील सदस्य व आप्तेष्टांना सोबत घेऊन बलगाडीच्या घुंगरांच्या निनादात व आराधी गाण्याच्या ठेक्यावर ढोलकीची थाप देत ही यात्रा नवरात्रकाळात तुळजाभवानी दरबारात दर्शन व कुलधर्म कुलाचार करीत असे. एकदोन दिवस मुक्काम करून देवीची पूजा होत असे. मातीने सारवलेली पुजारी वर्गाची छोटीशी जागा व त्यात पाचपन्नास माणसांचा स्वयंपाक करून देवीला नवेद्य दाखवून, त्यानंतर सर्व भाविक प्रसाद घेऊन आपापल्या गावी बलगाडीने परतत.
काळ बदलला, आधुनिकता अवतरली आणि परंपरेने भरणारी यात्राही आधुनिक साधनांच्या वापराने चकाकती झाली. बलगाडय़ांची जागा मिहद्रा जीप व एस.टी. महामंडळाच्या बसने घेतली. तुळजापूरला राज्यातील प्रत्येक क्षेत्र व भाविकांच्या मागणीनुसार शेकडो बसेस चालविल्यानंतर वर्षभर लोकांची वर्दळ वाढत गेली. पुजारी बसस्थानकावर येणाऱ्या भाविकांना आपल्या पूर्वजांची माहिती सांगून घरी घेऊन जात. ही परंपरा आजही कायम आहे. पुढे खासगी वाहनांची संख्या वाढली. १९९० नंतर चारचाकी व छोटय़ा गाडय़ांचा वापर वाढला आणि ही यात्रा मोजमाप करण्यापलिकडे जाऊन पोहोचली.
सध्या दररोज कमीत कमी ५० हजार व अधिकाधिक दीड लाख भाविक दर्शनास येतात. याचा परिणाम म्हणून वेळ व पसा याचे गणित विसंगत बनले आहे. दोन दिवस थांबणारे भाविक आता काही तासांत धार्मिक विधी आटोपून परतू लागले आहेत. पुजारी वर्गाच्या घरापर्यंत वाहने येऊ लागली. वाहनवाढीमुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली. परिणामी तुळजापूर विकास प्राधिकरणात ४ अतिभव्य वाहनतळे बांधली गेली आहेत. ४-५ भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली. आधुनिकतेसह तंत्रज्ञानाचाही परिणाम परंपरागत यात्रेवर झाला. तुळजापुरात पूजाविधी, प्रसाद खाऊन आशीर्वाद घेणे यासह ऑनलाइन दर्शनसेवा विकसित करण्यात आली. मंदिर संस्थानतर्फे दर्शन ‘लाइव्ह’ करण्यात आले.
देश-विदेशातून भाविक मोठय़ा संख्येने देवीचे दर्शन घेतात. शेणाने सारवले जाणारे ओटे व अंगणही विविधरंगी टाइल्सने सजवले गेले आहेत. चिमणीच्या दिव्यात किंवा चाळीसच्या बल्बमध्ये चालणारे घरकाम व भाविकांची सेवा व्हीआयपी बनून ती पीओपीपर्यंत पोहोचली. ऑनलाइन दर्शन व प्रसादाची व्यवस्थाही गेल्या दोन वर्षांत विकसित करण्यात आली. देवीचे भोपे पुजारी बुबासाहेब पाटील यांनी तुळजाभवानी क्षेत्रात व्यवस्थात्मक प्रगतीचे पाऊल सुमारे २० वर्षांपूर्वी टाकले. भाविकांची सेवा व समाधानाला सर्वोच्च स्थान देत धार्मिक विधी करताना त्यातील पावित्र्य व पूजाविधीचे काटेकोर पालन केले. प्रसाद, दर्शन, अभिषेक, सिंहासन पूजा आणि कुलधर्म-कुलाचार, त्यासाठी योग्य संभाषण यातून यात्रा करताना जो बदल केला. त्यामुळे ते आज सर्वात यशस्वी पुजारी म्हणून लौकिकपात्र ठरले आहेत. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे ते पुजारी. विलासरावांनीही त्यांच्या पूजा पद्धतीचे कौतुक केले. पूजेचा हा वारसा आता त्यांचे अभियंता पुत्र सचिन पाटील यांनीही चालविला आहे. आधुनिकता व तंत्रज्ञानाचा उपयोग करून बुबासाहेब पाटील यांनी पुजारी व्यवसायासमोर उत्तम आदर्श ठेवला. ऑनलाइन दर्शन, पूजा, प्रसाद या साठी त्यांनी स्वतचे ‘तुळजाभवानीदर्शनडॉटकॉम’ हे संकेतस्थळ विकसित केले. त्याला हजारो भाविकांनी भेट दिली.
कालानुरूप निसर्गनियमाने प्रत्येक घटकात होतात, ते बदल स्वीकारणे अनिवार्य बनते. तुळजाभवानीच्या नवरात्र, धार्मिक कार्यक्रमातही आधुनिकतेमुळे बलगाडीने चार दिवस चालणारी यात्रा प्रतितास शंभर-सव्वाशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाडय़ांमुळे आता मात्र चार तासांची बनली आहे.