अमरावती : दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना जिल्ह्यात दोन महिलांच्या हत्येच्या घटना घडल्या. अमरावतीत एका तरुणाने दुचाकी घेण्यासाठी आजीने पैसे दिले नाहीत, म्हणून तिची हत्या केली, तर दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथे एकाने पत्नीसोबत भांडणानंतर तिची हत्या केली. सोमवारी सकाळी आरोपी पतीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी त्याला वाचवले, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केवळ दोन हजार रुपये दिले नाहीत, म्हणून नातवाने आजीची हत्या केल्याची घटना रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथील राठीनगर परिसरात घडली. शांताबाई उद्धवराव चांदेकर (७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी आरोपी संतोष ऊर्फ स्वप्निल तुळशीराम कोडापे (२८, रा. अकोला) याला अटक केली आहे.

आरोपी संतोषने दुचाकी घेण्यासाठी दोन हजार रुपये दे, असा तगादा आजीकडे लावला होता. शांताबाईंनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग मनात ठेवून आरोपीने जड वस्तूने शांताबाईंच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केली. मुलगी मेघा हरले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.

दुसऱ्या घटनेत येवदा पोलीस हद्दीतील वडनेरगंगाई येथे आरोपी प्रभुदास बाबुशा पवार याने पत्नी उषा हिची शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. सोमवारी सकाळी घरासमोर गर्दी जमल्याचे पाहून आरोपी प्रभुदासने पंख्याला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी त्याला सोडवले. त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पती-पत्नींमधील भांडणतूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.