23 September 2020

News Flash

‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरील वादावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे नाव न घेता लगावला आहे.  ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरु असणाऱ्या टीकेला उदयनराजेंनी उत्तर दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदींशी करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाश काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडले. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शिवाजींच्या वंशजांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आज (मंगळवारी) पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

आणखी वाचा – बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? मोदींची महाराजांशी तुलना केल्याने उदयनराजे संतापले

बुद्धी गहाण ठेवली आहे का?

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा मला प्रश्न पडतो. या पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मी या कुटुंबामध्ये जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे मला याचा अभिमान आहे. महाराजांबद्दल कोणीही उठसूट यायचं आणि काहीही बोलायचं असं चालणार नाही,” असं उदयनराजे म्हणाले.

पवारांना टोला…

“शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला.

आणखी वाचा – शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

मुनगंटीवार यांनीही केली होती टीका

उदयनराजेंच्या आधी सोमवारी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांचा उल्लेख जाणता राजा असा करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं? अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केली होती. “जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं गेलं आहे. तेही तुम्हाला मान्य आहे,” अशी आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 12:48 pm

Web Title: udayanraje bhosle slams sharad pawar scsg 91
Next Stories
1 बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? मोदींची महाराजांशी तुलना केल्याने उदयनराजे संतापले
2 पैशाचा तमाशा : शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या स्वागत मिरवणुकीत उधळल्या नोटा
3 विधान परिषद : धनंजय मुंडे यांच्या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी
Just Now!
X