काँग्रेस नेते शशी थरुर, मणिशंकर अय्यर आणि दिग्विजय सिंह यांचे वर्तन एका अर्थाने ‘सुन्ता’ झाली असेच आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शशी थरुर यांच्या ‘हिंदू पाकिस्तान’ वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाने आकांडतांडव करण्यापेक्षा या लोकांना फार महत्त्व देऊ नये असा सल्लाच दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शशी थरुर यांच्या ‘हिंदू पाकिस्तान’ वक्तव्यावर भाष्य करताना मणिशंकर अय्यर आणि दिग्विजय सिंह यांच्यावरही टीका केली आहे. मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरुर यांच्या बेताल विधानांमुळे फक्त करमणूक होत असते हे ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारणात उगाच लुडबुड करू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

मणिशंकर अय्यर हे सरळसरळ पाकिस्तानधार्जिणे आहेत. पत्नी सुनंदा पुष्करच्या संशयास्पद हत्येनंतर थरुर यांचे नाव ज्या बाईशी जोडले गेले ती पाकिस्तानी महिला होती आणि दिग्विजय सिंग यांच्याविषयी काय बोलावे! जामा मशिदीच्या इमामाची ‘टोपी’ घालूनच ते वावरत असतात. हे सर्व लोक नावाने हिंदू आहेत. बाकी त्यांचे वर्तन एका अर्थाने ‘सुन्ता’ झाली असेच आहे. त्यामुळे भाजपने आकांडतांडव करण्यापेक्षा या लोकांना फार महत्त्व देऊ नये असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

ही तिन्ही मंडळी भाजपच्या राजकारणाला पोषक असेच बोलत असतात. लोकांना तर असाही संशय आहे की, थरुर, मणिशंकर, दिग्विजय हे म्हणजे भाजपने काँग्रेसच्या कळपात सोडलेले ’पोपट’ आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.