News Flash

माता-बाल संगोपन केंद्राचा प्रयोग यशस्वी

चार वर्षांत २६ हजार महिलांच्या प्रसूती तर दीड लाख महिलांची तपासणी

(संग्रहित छायाचित्र)

सुहास बिऱ्हाडे

गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात येणाऱ्या हजारो रुपयांच्या प्रसूती खर्चातून सुटका व्हावी यासाठी वसई-विरार महापालिकेने माता-बाल संगोपन केंद्राची स्थापना केली होती. पालिकेचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला असून चार वर्षांत या केंद्रात एक लाख ६८ हजार ३९३ महिलांची तपासणी करण्यात आली आहे, तर २६ हजारांहून अधिक महिलांच्या प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

गरोदर महिलांच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी खासगी डॉक्टरांकडून अवाच्या सवा पैसे उकळले जातात. सर्वसाधारण प्रसूती असेल तर ४० ते ५० हजार रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली असेल तर हा खर्च ८० हजारांपेक्षा अधिक जातो.  यासाठी वसई-विरार महापालिकेने शहरातील महिलांच्या प्रसूतीसाठी माता बाल संगोपन केंद्राची स्थापना केली.

वसई पूर्वेला सातिवली, सर्वोदय आणि नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे एक असे मिळून तीन माता बालसंगोपन केंद्र आहेत. २०१६ साली माता बाल संगोपन केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या केंद्रात चार वर्षांत १ लाख ६८ हजार ३९३ गरोदर महिल्यांची (बाह्य़ रुग्ण विभागात) तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ हजार ९४२ महिलांच्या प्रसूती करण्यात आली. एका केंद्रात दिवसाला २५ प्रसूती केल्या जातात. म्हणजे तासाला सरासरी एक प्रसूती शस्त्रक्रिया पार पाडली जाते. माता बालसंगोपन केंद्रात झालेल्या २६ हजार प्रसूतींपैकी २२ हजार प्रसूती या सर्वसाधारण होत्या तर केवळ साडेचार हजार प्रसूती या शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आल्या.  याबाबत माहिती देताना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी (प्रसूती विभाग) डॉ. गायत्री गोरख यांनी सांगितले की, माता बाल संगोपन केंद्रातून महिलांची संपूर्णपणे मोफत प्रसूती केली जाते. त्यामुळे महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात पालिकेचे २१ नागरी आरोग्य केंद्रे आहेत.    केंद्रात २३ डॉक्टर्स असून प्रत्येक केंद्रात सरासरी १६ कर्मचारी आहेत. तासाला एक प्रसूती या वेगाने येथे शस्त्रक्रिया होत असतात असेही त्या म्हणाल्या.

करोनाकाळात माता बाल संगोपन केंद्राचा आधार

करोनाच्या काळात अनेक गरोदर महिलांनी खासगी डॉक्टरांकडे नावे नोंदवली होती, मात्र करोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांनी या महिलांच्या प्रसूतीला नकार दिला होता. अशा सर्व महिलांच्या प्रसूती माता बाल संगोपन केंद्रात करण्यात आल्या. करोनाकाळात १८० करोनाग्रस्त महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. या महिलांना पालिकेच्या अग्रवाल आणि रिद्धिविनायक या रुग्णालयात सुरुवातीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रसूती करण्यात आल्या, तर ४४ महिला या करोनाग्रस्त असतानाच त्यांच्या सुखरूप प्रसूती शस्त्रक्रिया पार पाडल्या.

माता बाल संगोपन केंद्रात महिलांच्या विनामूल्य प्रसूती केल्या जात असून मागील चार वर्षांत २६ हजारांहून अधिक प्रसूती यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.

– डॉ गायत्री गोरख, क्षेत्रीय अधिकारी प्रसूती विभाग, वसई-विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 12:07 am

Web Title: vasai experiment of mother and child care center successful abn 97
Next Stories
1 ….अन् शरद पवारांनी रस्त्यावर ताफा थांबवून दिला नवदांपत्याला आशीर्वाद
2 …..म्हणून तर आम्ही १०५ आमदार घरी बसवले-संजय राऊत
3 शेतकरी आंदोलन देशभरात पसरण्यापूर्वी संपणं आवश्यक-सुशील कुमार शिंदे
Just Now!
X