वसई : तौत्के चक्रीवादळामुळे वसई-विरारमध्ये पुन्हा एकदा चार वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. वादळी पावसामुळे शहराच्या सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. जागोजागी झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते.  तौत्के चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसाने वसईकरांनी दाणादाण उडवली. नालेसफाई झाली नसल्याचा फटका शहराला बसला आणि शहराच्या अनेक भागांत पाणी साचले होते. तळमजल्यावरील घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या सामानाचे नुकसान झाले. शहराच्या पूर्व आणि पश्चिम पट्टय़ातील भागामंध्ये पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक बंद होती. तुळिंज पोलीस ठाण्यात पाणी शिरले होते. मंगळवारी दुपापर्यंत पाऊस सुरू असल्याने पाणी ओसरले नव्हते. यामुळे शहराची वाहतूक विस्कळीत झाली होती. अवकाळी पावसाने शहराच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजवले होते. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले होते. तर महावितरणच्या वीजवाहक तारांवर झाडे पडली होती. काही ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडून नुकसान झाले होते.