राज्य लोकसेवा आयोगाने गुरुवारी सकाळी MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा एमपीएससीकडून या सगळ्याचं खापर आपत्ती निवारण विभागावर फोडलं. ‘आपत्ती निवारण विभागाकडून आम्हाला प्राप्त झालेल्या पत्रानुसारच आम्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला’, असं स्पष्टीकरण एमपीएससीने केल्यानंतर या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी आपली बाजू मांडली असून त्यांनी याचं खापर त्यांच्याच खात्यातील अधिकारी वर्गावर फोडलं आहे!

१४ मार्च रोजी होणाऱ्या नियोजित MPSC पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अवघ्या ३ दिवस आधी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाचा निषेध करायला सुरुवात केली. पुण्याच्या नवी पेठेमधून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि हळूहळू महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थी या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले.

 

दरम्यान या प्रकरणावरून आता टोलवाटोलवी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आपत्ती निवारण खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या चुकीचं खापर अधिकारी वर्गावर फोडत स्वत:च विद्यार्थ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणातला संभ्रम अजूनच वाढला आहे. “माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला हा निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला हा निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल”, असं वडेट्टीवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे नेमकं हे सगळं घडलं कसं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

..तर वडेट्टीवारांनी राजीनामा द्यायला हवा – फडणवीस

या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “असं असेल तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे. असं कसं होईल की मंत्र्याला माहितीच नाही की त्याच्या खात्यात काय चाललं आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “सरकारमध्ये पूर्णपणे विसंवाद आहे. इतर गोष्टी होत असताना एमपीएससीमध्येच करोना का? सरकारची भूमिका चुकीची आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही. परीक्षा पूर्वनियोजित वेळेवरच म्हणजे १४ तारखेला व्हायला हवी”, असं देखील ते म्हणाले.