मनमाड रेल्वे स्थानकावर प्रसृत झालेल्या महिलेच्या नवजात शिशूची ग्रामीण रुग्णालयात आधी ‘मुलगा’ तर नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करताना ‘मुलगी’ अशी वेगवेगळी नोंद करण्यात आल्याने साशंकता व्यक्त केली जात आहे.
मनमाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर ही महिला प्रसृत झाली . महिला प्रवाशांनी तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून ग्रामीण रुग्णालयाने तिला दोन महिला पोलिसांसमवेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. तत्पूर्वी, नवजात बालकाची तपासणी करून मुलगा असल्याची नोंद करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात महिलेला दाखल करून घेताना मातेसोबत मुलगी असल्याची नोंद केली गेली. जर मनमाडला ‘मुलगा’ अशी नोंद झाली तर नाशिकला ‘मुलगी’ अशी नोंद का करण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला.
मनमाडच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. बी. शेख यांनी परिचारिकांनी नवजात शिशूची पाहणी करून सांगितल्यानुसार मुलाची नोंद करण्यात आल्याचे नमूद केले. जिल्हा रुग्णालयाने शिशूची ‘मुलगी’ अशी नोंद केल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत अन् संशयही वाढला आहे. नवजात शिशूची अदलाबदल झाली की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक रवींद्र शिंगे यांनी तशी शक्यता फेटाळून लावली. उपरोक्त महिला मनोरुग्ण आहे. तिची प्रसृती रेल्वे स्थानकावर झाली. बाहेर जन्म झाल्यामुळे नवजात शिशूची नोंद आमच्याकडे नाही. मनोरुग्ण व्यक्तींवर उपचार करण्याचे अधिकार ग्रामीण रुग्णालयांना नसून ते केवळ जिल्हा रुग्णालयाला असल्याचे शिंगे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात संबंधित केवळ उपचारासाठी दाखल झाली आहे. महिलेजवळील शिशू ‘मुलगी’ असल्याचे त्यांनी सांगितले.