दहा वर्षांपूर्वी गावातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. बहुमतांनी संमत झालेल्या ठरावाने हे दुकान बंद झाले, तरी प्रत्यक्षात इतरत्र ५० ठिकाणी अवैध दारूविक्री होत असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकार दारूबंदीला आळा घालू शकत नसेल, तर अधिकृत सरकारमान्य दुकान सुरू करा, असा ठराव महिलांनी ग्रामसभेत मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावाची ही कैफियत आहे. दहा वर्षांपूर्वी गावातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. १ हजार ६२९ महिलांनी दुकान बंद करण्यासाठी, तर बाजूने ११८ महिलांनी मतदान केले. मात्र, १० वर्षांत सरकारमान्य दुकान बंद असले, तरी ५० ठिकाणी अवैध दारूविक्री होत आहे. परंतु अनेकांचे संसार यामुळे उद्ध्वस्त झाले. शिवाय या मंडळींची दादागिरी वाढली. त्यामुळे सरकार दारूबंदीला आळा घालू शकत नसेल, तर अधिकृत सरकारमान्य दारू दुकान सुरू करा, असा ठराव महिला ग्रामसभेत मांडून एकमताने पारित करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी दत्ता पाटील यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती २५ ऑगस्टला झालेल्या सभेत दिली. सरकार अवैध दारूविक्री थांबवत नाही. त्यामुळे नवीन देशी दारू दुकान सुरू करण्याची मागणी वाजिदाबी शेख या महिलेने सभेत केली. त्यास वर्षांराणी हेंगणे यांनी अनुमोदन दिले व ६०० महिलांच्या उपस्थितीत ठरावाला एकमताने पािठबा देण्यात आला. माजी सरपंच जयश्री पवार यांनी मात्र महिला ग्रामसभेत महिलांची दिशाभूल करून हा ठराव संमत केला; तो लोकशाहीविरोधी असल्याची प्रतिक्रिया दिली. राजकीय वैरापोटी जनतेला वेठीस धरून ही ग्रामसभा घेण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य विलास पवार यांनी केला. अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारू दुकान पुन्हा सुरू करणे हा पर्याय नाही, असे पवार यांचे म्हणणे आहे.
सरकारच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत देशी दारू दुकान पुन्हा सुरू करण्याची आगळी मागणी मांडत, ६०० महिलांनी एकमुखाने त्याला पािठबा देत ती मान्य करून घेण्याच्या खेळीची जिल्हाभरात जोरदार चर्चा होत आहे. प्रशासन याकडे कोणत्या गांभीर्याने पाहते, या दारू दुकानास नव्याने परवानगी दिली जाते, की गावातील अवैध दारूविक्री थांबवण्यासाठी ठोस पावली उचलली जातात, याकडे आता हडोळतीकरांचे लक्ष आहे.