राज्यात आज सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीत पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अशातच महाबळेश्वरमधील लिंगमळा आणि वेण्णालेक परिसरात दरवर्षीप्रमाणे थंडी वाढली असून दवबिंदू गोठल्याने सर्व परिसर बर्फाच्छादित झाला आहे.

परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे, शेतीतील पिकांच्या पानावर, मोटारीवर व वेण्णा लेकच्या मार्गावर दवबिंदू गोठल्याचे चित्र आहे. महाबळेश्वरातील पर्यटकांनीही आज सकाळी या परिसरात फिरून गुलाबी थंडीसह या नयनरम्य दृश्याचा आनंद घेतला. परिसरातील नागरिक हाताने बर्फ गोळा करतानाही दिसत होते. मागील आठ दिवसांपासू महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील थंडी वाढली असून नागरिकांना व पर्यटकांना संरक्षणासाठी शेगडया आणि उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागत आहे.