हल्ली लोक शिकले आहेत, पण शिकूनही सुशिक्षित होऊ शकले नाहीत, अशी खंत व्यक्त करून भारतीय संस्कृती व परंपरा जगभरात प्रसिद्ध असली, तरी आम्हीच आमच्या हाताने ती संपवत आहोत. आपल्या संस्कृतीचा बर्मुडा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून चित्रपटातील नट पसे घेऊन अभिनय करतात. मात्र, कोणत्याही अपेक्षेशिवाय जी मंडळी काम करतात, तेच खऱ्या अर्थाने समाजाचे रिअल हिरो असतात, असे मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.
परळी येथे मारवाडी युवा मंचच्या अकराव्या समाजभूषण सुवालाल वाकेकर स्मृती पुरस्काराचे वितरण अनासपुरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष ललित गांधी, आदर्श ग्रामयोजनेचे प्रणेते हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरणकुमार गित्ते यांचा गौरव करण्यात आला. अनासपुरे म्हणाले की, ज्ञान आणि प्रभुत्व ही कोणाची मक्तेदारी नाही. प्रत्येकाने होईल तेवढे जास्तीचे शिक्षण घेतले पाहिजे. शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज आहे. ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटातील संवाद त्यांनी सादर केले. चाळीसपेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, हा धागा पकडून ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी’ याप्रमाणे आपण इतरत्र गुणवत्ता शोधत असतो. केवळ भाषण आणि व्याख्याने देऊन काही होत नाही तर चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करावी लागते, असेही त्यांनी सांगितले.
सत्कारमूर्ती ललित गांधी म्हणाले, की जिथे कमी तिथे आम्ही हे समीकरण आम्ही जपले. या सत्काराने आणखी मोठे काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्रिपुरात जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कामाचा अनेकदा गौरव झाला. परंतु परळीत झालेला गौरव महत्त्वाचा आहे, असे किरणकुमार गित्ते यांनी सांगितले. पोपटराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक चंदुलाल बियाणी यांनी केले.