कराड : जमिनीच्या वादातून पारधी समाजातील महिलेला झोपडीसह जाळण्याचा भीषण प्रकार पिंप्रद (ता. फलटण) येथे बुधवारी घडला. यामध्ये संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महुली ऊर्फ मौली झबझब पवार (वय ६०, रा. पिंप्रद, ता. फलटण) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत कल्पना अशोक पवार (वय ४५, रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे या चौघांविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. सुनील मोरे हा पाचवा संशयित फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती फलटण विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली.

कल्पना पवार यांचे सासरे झबझब पवार यांनी जवळपास ३० वर्षांपूर्वी पिंप्रदमध्ये प्रल्हाद मोरे यांची २५ गुंठे जमीन खरेदी केली होती. मात्र, त्यांना मोरे व त्यांचे नातेवाईक जमीन कसू देत नव्हते. यावरून मोरे यांच्यासोबत पवार कुटुंबाचा वाद होता. जमीन वहिवाटीसाठी एक वर्षांपूर्वी मोजणी आणून मोजणीनंतर या जमिनीमध्ये पवार कुटुंबाने झोपडी बांधली होती. मात्र, ती कुंडलिक भगत, सतीश भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मोरे यांनी पाडून टाकली होती. यानंतर १० फेब्रुवारीला कल्पना पवार या त्यांची मुलगी रोशनी व काजल, सून मातेश्री, नणंद महुली ऊर्फ मौली यांनी त्या जमिनीवर पुन्हा झोपडी उभारली.

मात्र आरोपींनी पुन्हा त्या रात्रीच या कुटुंबावर हल्ला केला तसेच झोपडी पेटवून दिली. या वेळी झोपडीतील मुलीसह तीन महिला बचाव करत पळाल्या. मात्र महुली पवार या वृद्धेला झोपडीतून बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला