रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचली नाही

गडचिरोली : चांगले रस्ते नसल्याने नागरिकांचे कसे हाल होतात, याचा प्रत्यय रविवार ९ सप्टेंबर रोजी भामरागड तालुक्यातील हितापाडी येथे आला.  प्रसूतीसाठी एका महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करायचे होते, परंतु गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तिला ट्रॅक्टरने कसेबसे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वाटेतच तिची प्रसूती झाली.

तालुका मुख्यालयापासून १३  किलोमीटर अंतरावर हितापाडी हे गाव आहे. अरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या गावाचा समावेश होतो. या गावातील शांती राकेश पुंगाटी या महिलेला रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. ही माहिती आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तिला आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका पाठवली, परंतु हिदूर गावापासून हितापाडी गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही.  शिवाय नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पायवाटदेखील चिखलाने माखली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत नेणे शक्य होत नव्हते.

दुसरीकडे महिलेच्या प्रसूती कळा वाढल्याने तात्काळ रुग्णालयात नेणेआवश्यक होते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत ट्रॅक्टर बोलावला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत महिलेला झोपवण्यात आले. यावेळी डॉक्टर आणि परिचारिकाही सोबत होत्या. जंगल, खड्डे आणि चिखलातून मार्ग काढत ट्रॅक्टर अरेवाडा गावाच्या दिशेने जात होता. मात्र, खड्डय़ांमुळे महिलेची वाटेतच प्रसूती झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. डॉक्टर व परिचारिका असल्याने प्रसूती सुरळीत पार पडली. महिला आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे.

एकीकडे सरकार मोठय़ा शहरांमधून कोटय़वधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करत आहे, परंतु दुर्गम भागातील नागरिकांना मात्र रस्त्याअभावी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे.

आरोग्य खात्याची तत्परता

२९ जुलैला कुरखेडा तालुक्यातील कोलडोह येथील सिकलसेलग्रस्त  महिला प्रसूतीस विलंब होत असल्याने रुग्णालयातून गावाला परत गेली होती. त्यावेळी तहसीलदारांसह डॉक्टर व अख्खे प्रशासनच तिच्या प्रसूतीसाठी गुडघाभर पाण्यातून गावात गेले होते. त्यानंतर आज आरेवाडा येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यतत्परता दाखवली.