14 October 2019

News Flash

धक्कादायक ! पुण्यात दारुच्या व्यसनाला कंटाळून पतीची हत्या, अंगणातच जाळला मृतदेह

पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये यासाठी महिलेने हत्येचा गुन्हा मुलांवर ढकलण्याचा प्रयत्न केला

पुण्यात दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने साडीने गळा दाबून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर मृतदेह घराच्या अंगणात जाळून दिला. पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये यासाठी महिलेने हत्येचा गुन्हा मुलांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपास केला असता महिलेचं पितळ उघडं पडलं. विद्या कांबळे असं आरोपी महिलेचं नाव आहे.

विद्या कांबळे आपले पती निलेश कांबळे यांच्या दारुच्या व्यसनाला कंटाळल्या होत्या. रोज होणाऱ्या भांडणांमुळे विद्या कांबळे यांनी निलेश कांबळे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. साडीने गळा दाबून त्यांनी पतीची हत्या केली. आपल्यावर संशय येऊ नये यासाठी त्यांनी थेट मुलांवरच हत्येचा आरोप केला.

जेवण वाढण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून मुलांनी ढकलल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा खोटा बनाव त्यांनी केला. इतकंच नाही तर पतीच्या मृत्यूची माहिती लपवण्यासाठी विद्या कांबळे यांनी अंगणातच मृतदेह जाळून टाकला होता.

निलेश कांबळे यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार करत संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता विद्या कांबळे यांचं पितळ उघडं पडलं. पोलिसांनी विद्या कांबळे यांना अटक केली आहे.

First Published on December 7, 2018 4:26 am

Web Title: woman killed husband and burns dead body in pune