13 December 2017

News Flash

पराभवामुळे भाजपमध्ये गटा-तटाच्या राजकारणाला उधाण

पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माधव गवळी यांनी जिल्हाध्यक्ष माने यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

खास प्रतिनिधी, रत्नागिरी | Updated: March 10, 2017 6:57 PM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समित्यांमधील दारुण पराभवानंतर जिल्हा भाजपमध्ये गटा-तटाच्या राजकारणाला उधाण आले असून जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या साथीने आठ जागा जिंकलेल्या भाजपला यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत खातेसुद्धा खोलता आले नाही. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारीत पक्षाच्या तालुका व जिल्हा पातळीवरील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तसेच पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माधव गवळी यांनी जिल्हाध्यक्ष माने यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. यावर पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभूत उमेदवार सूर्यकांत साळुंखे, उदय जोशी यांनी मानेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जिल्ह्यातील आणखी काही तालुका पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, तर गवळी यांनी पुन्हा माने यांच्यावर तोफ डागत त्यांची गच्छंती अटळ असल्याचे पत्रकार परिषद घेऊन ठामपणे सांगितले. माने यांच्याऐवजी रत्नागिरी व गुहागर तालुका वगळता जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमधून अनुभवी कार्यकर्त्यांची नियुक्ती या पदावर केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या २५ वर्षांत सेनेच्या साथीने निवडणुका लढवताना पक्षसंघटनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या अहंकारी, हट्टी भूमिकेमुळे ही नामुष्की पत्करावी लागल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेऊनही पक्षाला या निवडणुकीत एकसुद्धा जागा जिंकता आली नाही, या वस्तुस्थितीकडे हे कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत.

आगामी विधानसभा लक्षात घेता या निवडणुकीतील मानहानीकारक अपयशाबद्दल पक्षपातळीवर गंभीर चिंतन करून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी जोमाने संघटित  होण्याची गरज असताना जिल्हा भाजपला मात्र अशा प्रकारे अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने ग्रासले असून पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

First Published on March 8, 2017 1:22 am

Web Title: zp election 2017 bjp