राज्यात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून आतापर्यंत ३१ टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक आणि कलाकार हे मोठ्या संख्येने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आहे. या लोकशाहीच्या उत्सवात पुण्यातील लोहगाव भागात राहणारे १०२ वर्षाचे आजोबा हाजी इब्राहिम जोड हे रूग्णालयात उपचार घेत होते.

आज रुग्णालयातून बाहेर पडून, कुटुंबातील ४० सदस्यांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. या वयात मतदान करण्याविषयीचा उत्साह पाहून, सर्वांनी त्यांचे कौतुक देखील केले.

यावेळी १०२ वर्षांचे आजोबा हाजी इब्राहिम जोड यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, माझे वय १०२ वर्ष असून प्रत्येक निवडणुकीत, मतदान केले आहे. मी चार दिवसांपासून आजारी आहे, नातवंडं आणि मुलांना सांगितले. मला आज मतदान करायचे आहे. त्यावर डॉक्टरची परवनगी घेऊन, रुग्णालयातून बाहेर येऊन, मतदान करण्याचा हक्क बजावला आहे. आज देखील पाहिल्या निवडणुकीप्रमाणे उत्साह असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने मतदान करून, लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

१०२ वर्षाच्या आजोबांचे २७० जणांचे कुटुंब

राजस्थान येथे १९१७ मध्ये हाजी इब्राहिम जोड यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती सर्व सामान्य कुटुंबाप्रमाणे होती. त्यावेळी आपल्या देशात ब्रिटिश राजवट असल्याने, १९४५ च्या आसपास इब्राहिम जोड यांनी ब्रिटिश शासनामध्ये तीन वर्ष काम देखील केले आहे. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी कुटुंबातील १२ सदस्यांना घेऊन, पुण्यात १९५० च्या दरम्यान स्थायिक झाले आणि आजअखेर पर्यंत राहत आहे. कुटुंबातील अनेक सदस्य अनेक उद्योग व्यवसाय करीत असून आज या कुटुंबात २७० जण आहे.

१०२ वर्षांच्या आजींनीही मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीत उमरखेड या ठिकाणी सुंदराबाई पुंजाराम सूर्यवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावला.