12 November 2019

News Flash

आम्ही सुपारी घेणारे व मते कापणारे नाही – जलील

विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर तुम्हाला चालते. पण आम्ही मैदानात उतरलेले चालत नाही.

विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर तुम्हाला चालते. पण आम्ही मैदानात उतरलेले चालत नाही. आमच्यावर मत कापणारे व सुपारी घेणारे, असा आरोप केला जातो. त्यात तथ्य नाही. स्वत:ची मतपेढी निर्माण करण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन खासदार म्इम्तीयाज जलील यांनी केले.

विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार सुरेश जगधने यांच्या प्रचार सभेत खासदार जलील बोलत होते.  यावेळी पक्षमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकिल मुजावर, शफी उल्ला काझी, जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, साजिद मिर्झा,  इरफान शेख, भागीनाथ काळे यावेळी उपस्थित होते.

खासदार जलील पुढे म्हणाले, काँग्रेस—राष्ट्रवादीचे नेते हे सेना भाजपात जातात. तर दोन्ही काँग्रेसमध्ये सेना भाजपवाले येत आहेत. हे पक्षांतर त्यांना चालते. मात्र आम्ही उमेदवारी केलेली मानवत नाही. दलित—मुस्लीम यांची मते आमची जहागिरी आहे, असा समज सर्वच पक्षांचा आहे. सत्तर वर्ष हेच काम करण्यात आले. मात्र आता एमआयएम स्वत:ची मतपेढी तयार करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. पक्ष राज्यात ४४ जागा लढवित असून त्यात मुस्लीमांबरोबर दलित, मातंग, बंजारा, ख्रिश्चन या समाजातील लोकांना उमेदवारी दिली आहे, असे ते म्हणाले.

केवळ मुस्लिमांचा पक्ष म्हणून या पक्षावर टिका केली जाते. झोपडपट्टीत दलित व मुस्लीम समाज राहतो, ७० वर्षांत त्यांचा विकास झाला नाही. मात्र त्यांची मते सर्वानी घेतले. जोपर्यंत आपली सत्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला लढावे लागेल. येत्या निवडणुकीत नवरदेव आमचा असून वऱ्हाडी त्यांना बनविणार आहोत.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण सौदेबाजी केल्याची टिका केली जात होती. मात्र जनतेने त्यांची जागा दाखवून दिली, असेही ते म्हणाले.

माजी आमदार स्वर्गीय जयंत ससाणेंनी तयार केलेले आमदार भाऊसाहेब कांबळे त्यांचे झाले नाही तर ते जनतेचे कधी होतील, तरी ते मते मागत आहेत. या निवडणुकीत दलित, मुस्लिम मतदारांनी आपली मते विकत देऊ नयेत, ती जगधने यांच्या पारडय़ात टाकून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

First Published on October 15, 2019 4:30 am

Web Title: congress ncp akp 94 3