कन्हैया कुमारचा मुंब्य्रात विद्यार्थ्यांशी संवाद

समाज माध्यमांवर सांप्रदायिकता, द्वेष, मंदिर-मशीद, हिंदू-मुस्लीम आणि माणसांना मारणारे संदेश फिरत आहेत. मात्र, आपण सर्वानी आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवारा आणि महागाई हेच प्रश्न विचारायला हवेत, असे मत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी शुक्रवारी मुंब्य्रात विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.

कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी कन्हैया कुमार हे शुक्रवारी मुंब्य्रात आले होते. त्यावेळेस त्यांनी मुंब्रा-कौसा येथील ए. ई. काळसेकर महाविद्यालय, एम.एस. कॉलेज आणि सिम्बायोसिस कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

व्हॉट्स अ‍ॅप विद्यापीठामधून खोटे जुमले, गोळी, हिंसाचाराच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच समाज माध्यमांवर सांप्रदायिकता, द्वेष, मंदिर-मशीद, हिंदू-मुस्लीम, माणसांना मारणारे संदेश फिरत आहे. मात्र, आपण सर्वानी आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवारा आणि महागाई हेच प्रश्न विचारायला हवेत, असे मत कन्हैया यांनी व्यक्त केले. माहिती अधिकाराचा योग्य वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले.

हजारो वर्षांची परंपरा, रीतिरिवाज, आपली संस्कृती, आपला

विकास आणि वीरांच्या शौर्याला जपणारा हा देश आहे. पण आता सकाळी गांधींना नमस्कार करणारे- सायंकाळी गोडसेंना सलाम करणारे जन्माला येत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.