राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बंडखोरी करणारे त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीस सरकार फारकाळ टिकणार नाही हे स्पष्ट झाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. आधी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळात देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक झाली. त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतल्यास योग्य तो सन्मान राखू असा शब्द या बैठकीत अजित पवारांना दिल्याची माहिती आहे.

शरद पवारांनी या बैठकीत अजित पवारांना बुधवारी विधानसभेत होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अनुपस्थित राहा किंवा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दे असे सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. सुनील तटकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील असे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना भेटत होते.