– भागवत हिरेकर

आम्हीच येणार. बहुमत घेऊन येणार. २२० जागा आणणार असं म्हणत आभाळाला हात लावणारी भाजपा निवडणूक निकालानंतर दणकन जमिनीवर आदळली. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून मतदारांनी भाजपाला कौल दिला. पण, नाकात हवा गेलेल्या वासराला जसं वेसन लावणं गरजेचं असतं, तसच वेसन मतदारांनी भाजपाला लावलं आहे. पुन्हा सत्तेची संधी दिली असली तरी मतदार आणि पक्षासाठी तळवे झिजवणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना गृहित धरून आपण दाखवू ती पूर्व दिशा आणि आपण म्हणू तेच बरोबर ही एककल्ली वृत्ती लोकांनी नाकारली. लोकशाहीत प्रत्येकाची अभिव्यक्ती महत्त्वाची असते आणि निवडणुकीतील विजयासाठी विरोधकाची प्रतिमा हनन करण्याचा जो पायंडा भाजपानं पाडला होता, तोही धुडकावून लावला. पाच वर्षांच्या काळातील वागणुकीपासून ते सरकारनं घेतलेल्या निर्णयाला जनतेनं या निकालातून उत्तर दिलं आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार आणि सत्ताधाऱ्यांना कंटाळलेल्या महाराष्ट्रानं भाजपाच्या हाती सत्ता दिली. १२२ जागा मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण, या यशानं हुरळून गेलेल्या भाजपानं मित्रपक्ष, विरोधीपक्ष, मतदार आणि स्वतःच्या पक्षातील जमिनीवर काम करणाऱ्यांना बगलेत दाबून कारभार हाकण्याचं काम केलं. नैतिकता आणि संस्कृतीची चाड आम्हालाच आहे आणि तज्ज्ञ असले तरी तुमच्या घरचे, अशा अविर्भावात सत्ता राबवली. निवडणूक निकालाचा विचार केला तर स्पष्ट बहुमतापर्यंत मजल मारण्याचा दावा करणारी भाजपा शंभरीतच का अडकली? याच उत्तर भाजपा असंच आहे.

राजकीय महत्त्वकांक्षा असणं चुकीचं नाही. ते अगदी गावात काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यालाही असतेच. मग संघर्ष करत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पोहोचणाऱ्यांनी ती ठेवू नये हे चूकच. सत्तेत कमी आणि विरोधी बाकांवर बसणाऱ्या भाजपामध्ये मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा असणारे बरेच होते. अशा काटेरी खुर्चीवर देवेंद्र फडणवीस येऊन बसले. त्यामुळे स्वपक्षातून राजकीय विरोधक निर्माण होणे साहजिकच होतं. त्यांना त्यांच्या कलानं घेऊन शमवणं गरजेचं असताना दिल्लीचा आशिर्वाद आपल्याच पाठिशी आहे. अशा अविर्भावात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदावर नजर असलेल्यांना बाजूला सारले. त्याचबरोबर पक्षातील निष्ठावंतांना आणि गेली पाच वर्ष मतदारसंघात काम करणाऱ्यांना डावलून आयातांना तिकीट देण्याचा निर्णय किती आत्मघाती होता, हे निकालानंतर भाजपाला उमजले. खरतर हे शहाणपणा अगोदरच आलं होत, पण डोळ्यावर सत्तेची धुंदी असल्यानं त्यांनी त्याकडं दुर्लक्षच केलं.

देश, राज्य, पालिका, ग्रामपंचायत या सगळ्याच निवडणुकांचे मुद्दे वेगळे असतात पण, राष्ट्रवादाने भारावलेल्या भाजपानं सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरही राष्ट्रवादाची फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. लोकसभेप्रमाणेच राज्यातही तोच मुद्दा रेटला. एकीकडं बेरोजगारी, दुष्काळामुळे वाढलेलं स्थलांतर, शेती क्षेत्रातील संकट आणि आर्थिक अरिष्ट या बाबींवरही भाजपानं आम्ही सच्चे राष्ट्रवादी आहोत हेच उत्तर दिलं. हे सगळं मतदारांना आवडतय हे गृहीतच भाजपानं मनाशी ठरवून ठेवलं होतं. त्यांचा हा अतिआत्मविश्वासच भाजपाला नडला.

दुसर महत्त्वाचं म्हणजे निरकुंश सरकार हाती किती धोक्याचं आहे, हे मतदारांनी गेल्या पाच वर्षात अनुभवलं. त्यामुळेच विरोधी पक्ष नावाचा अंकुश असणं गरजेचं असतं आणि त्याचाही सन्मान केला पाहिजे. हे मतदारांना पटल्याचं जनादेशातून प्रतिबिंबीत झालं. सातत्यानं भूमिका बदलणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षालाही फार डोक्यावर घ्यायचं नाही, हे शहाण्या झालेल्या मतदारांनी निकालातून दाखवून दिलं. विरोधकांच्या बाबतीत मतदारांनी बरेच इशारे दिले. फक्त आयती मते कुणीही पदरात घालणार नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. सोशल मीडियातून हवा करून पदरात काही पडणार नाही. त्यासाठी पायाला भिंगरी लावून घराघरांपर्यंत तुमची धोरणं, विचार पोहोचवावा लागेल.

परळी, कर्जत जामखेड, बीड येथील लक्षवेधी निकाल हाच संदेश देतात. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेलं यशामागेही हेच कारण आहे. फक्त सोशल प्रचारावर विसंबून न राहता पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभं राहण्याचं बळ देण्यासाठी प्रत्यक्ष संवादाची गरज आहे. आपण रस्त्यावर उतरलो तर कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळते हा अनुभव पाठिशी असलेल्या पवारांनी तेच केलं. विशेष म्हणजे पराभव कितीही मोठा असला तरी तुम्ही ठाम राहिलात तर लढण्याचं बळ आपोआप येत हा धडा अपयशानं पक्षपदाच्या त्याग करणाऱ्या राहुल गांधींनी घ्यायला हवा, हाच या निवडणुकीचा संदेश आहे.

bhagwat.hirekar@loksatta.com