राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या दृष्टीने समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येऊन सत्तास्थापन करण्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. दरम्यान तिन्ही पक्ष एकत्र येण्याआधी सामायिक कार्यक्रम तयार करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक पार पडली. राष्ट्रवादीच्या या समितीत अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे.

नवाब मलिक यांनी याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं की, “शरद पवारांना आम्ही सर्वाधिकार दिले आहेत. एक समिती गठीत होईल. समिती आणि शरद पवार यांची सरकार स्थापनेबाबत चर्चा होणार आहे”. “महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाल्यानंतर आता पुढे काय करायचं याचा निर्णय शरद पवारांच्या हाती असणार आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं होतं.

भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत असून, त्यांच्या वाटाघाडी मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि इतर खात्यांसंदर्भात सुरू आहेत. कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, तो किती वर्षांसाठी असेल, कोणत्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असेल तोही किती वर्षांसाठी असेल, याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवाय कोणत्या पक्षाला कोणत्या किती मंत्रिपदे असावीत, यावर एकमत होण्यासाठी धडपड सुरू असल्याचे समजते.

शिवसेना आतापर्यत मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपाशी असलेली युतीही तोडली आहे. त्यामुळे शिवसेना या महाशिवआघाडीतही मुख्यमंत्रिपदासाठी अडून आहे. शिवसेनेचे संख्याबळ ५६ आहे, त्यापेक्षा राष्ट्रवादीकडे केवळ २ आमदार कमी आहेत. ५४ आमदारांचे बळ असलेली राष्ट्रवादीही पहिल्या टर्मसाठी आग्रही राहू शकते. यातही वाटाघाडी झाल्याच तर अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतले जाऊ शकते. काँग्रेसच्या वाट्याला यात ५ वर्षांसाठी उपमुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी या पदावर समाधान मानावे लागेल. कारण, ”सत्तेत सहभागी झालो नाही तर राज्यातील काँग्रेस संपेल,” असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिला आहे.