शिवसेनेमधील संबंध, आघाडीच्या भक्कम सहकार्यामुळे मतदारसंघावर वर्चस्व

शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले सुनील टिंगरे यांनी वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघात सत्तधारी भारतीय जनता पक्षाला धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज गटाने भाजपमध्ये केलेला प्रवेश, गावकी-भावकीचे राजकारण अशी परिस्थिती असतानाही टिंगरे यांनी वडगांव शेरीत ४ हजार ९७५ मतांनी विजय मिळविला. टिंगरे यांचे शिवसेनेमधील संबंध, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीची भक्कम साथ यामुळेच हा मतदारसंघ भाजपकडून खेचून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या वडगांव शेरी मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे जगदीश मुळीक यांनी आश्चर्यकारक विजय मिळविला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या सुनील टिंगरे यांचा त्यांनी पाच हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली. टिंगरे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यानंतर उमेदवारीवरून राष्ट्रवादीत रस्सीखेच झाली. टिंगरे यांना उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार बापू पठारे नाराज झाले. त्यामुळे नाराज पठारे आणि त्यांच्या समर्थक मंडळींना हाताशी धरून विजयाची मोट बांधण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. मात्र त्याचा कोणताही परिणाम राष्ट्रवादीवर दिसून आला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीने एकदिलाने टिंगरे यांना निवडून आणले. पहिल्या फेरीपासूनच टिंगरे यांनी सर्व भागात घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. शिवसेनेतील नेत्यांबरोबर टिंगरे यांचे संबंध, मतदारसंघ न मिळाल्यामुळे शिवसेनेची नाराजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचीही न मिळालेली साथ यामुळे मुळीक यांना पराभवाचा धक्का बसला. गावकी-भावकी, नाराजी असूनही टिंगरे यांनी बाजी मारली.

९७,७०० सुनील टिंगरे- (राष्ट्रवादी काँग्रेस)

९२,७२५ जगदीश मुळीक- (भाजप)