नीरज राऊत

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्य़ात सुमारे ५१ हजार मतदारांची वाढ झाली आहे. त्यापैकी अधिक मतदार अखेरच्या ३६ दिवसांत वाढले आहेत. नालासोपारा विधानसभा क्षेत्रात २५ हजार, तर बोईसर विधानसभा क्षेत्रात १३ हजार मतदार संख्येत वाढ झाली आहे.

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी वर्षभराच्या कालावधीत एक लाख ५४ हजार मतदारांची वाढ झाली होती. त्यापैकी ७२ हजार नवीन मतदार हे अखेरच्या साडेतीन महिन्यांत नोंदले गेल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्ह्यात झपाटय़ाने मतदार नोंदणीची हीच परंपरा आणि कार्यपद्धती विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू राहिल्याने दीड महिन्याच्या (प्रत्यक्षात ३६ दिवस) कालावधीत जिल्ह्य़ात ५० हजार ८३३ मतदार वाढले आहेत. मतदान नोंदणीकरिता दोन विशेष कार्यक्रम राबवण्यात आले. त्या अनुषंगाने नालासोपारा मतदारसंघात २४ हजार ७९७, बोईसर मतदारसंघात १२ हजार ७२३, तर वसईत सात हजार ६१७ इतके मतदार वाढले आहेत.

प्रत्यक्षात जिल्ह्यात ५७ हजार ४०३ नव्या मतदारांची नोंद १५ जुलैनंतर करण्यात आली. मतदार यादीतून ७०९२ मतदारांची नावे वगळण्यात आली. वगळलेल्या मतदारांच्या नावांमध्ये नालासोपारा आणि बोईसर या विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी २५१०, विक्रमगडमध्ये ११०१, तर डहाणूत ९४८ मतदारांचा समावेश आहे. १५ जुलैपासून ऑगस्ट अखेरीपर्यंत झालेल्या मतदार नोंदणीची आकडेवारी पाहता नालासोपाऱ्यात सरासरी प्रतिदिन ६८९, बोईसरमध्ये ३२७, वसईत २१२, पालघरमध्ये ६७, विक्रमगडमध्ये ६० आणि डहाणूत २१ मतदार अशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

अशा प्रकारे जिल्ह्य़ात ३६ दिवसांच्या कालावधीत सरासरी प्रतिदिन १३७६ मतदार संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हीच मतदार संख्या कायम राहण्याची शक्यता असून जिल्हा निवडणूक विभाग विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.