सुमित राघवन, अभिनेता

’ निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते?

मुद्दे सांगायचे तर गेल्या निवडणुकांमधील आश्वासने आठवावी लागतील. हा गमतीचा भाग झाला, परंतु इथे वर्षांनुवर्षे तेच मुद्दे आहेत. सरकार बदलले तरी समस्या काही बदलल्या नाहीत. ‘पायाभूत सुविधा’ हाच इथला मूळ प्रश्न आहे. रस्त्यांची दुरवस्था पाहवत नाही. अनधिकृत बांधकामे आजही उभी राहत आहेत. जुन्यांवर कारवाई होत नाही. पर्यावरणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. एक रुपयात तपासणी आणि दहा रुपयांत जेवण देण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विचार करायला हवा.

’ या मुद्दय़ांना पक्ष भिडतात असे वाटते का?

पक्ष कोणताही असला तरी प्रत्येक उमेदवाराचे निवडणूक लढवण्याचे मुद्दे वेगळे असतात. अशा वेळी पक्षाच्या मुद्दय़ांपेक्षा आपल्या स्थानिक उमेदवाराचे काम जास्त लक्षात घ्यावेसे वाटते, मग तो कोणत्याही पक्षात असो.

’ तुम्ही उमेदवार असता, तर प्राधान्य कशाला असते?

विभागातील समस्यांवर आणि विशेषत: सामान्यांच्या प्रश्नांवर; किंबहुना आजही मी मिळेल तेवढा वेळ पाल्र्यातील सामाजिक कामांसाठी देत असतो. प्रतिनिधी म्हणून तुम्ही सामान्यांशी संपर्क  ठेवला तरच त्यांच्या अडचणी समजतील.. आणि अशा अडचणींत सामान्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवे. अन्यथा के वळ वरवरचे भाष्य करत ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ हे केव्हाहीनिर्थकच.

’ नवमतदारांना काय संदेश द्याल?

माझ्याच घरात यंदा दोन नवमतदार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य मी जाणतो. तरुणांनी त्यांचे निकष लावून डोळस पद्धतीने मतदान करावे; परंतु ‘मतदान कराच’ हे मात्र सक्तीने सांगेन. आताच्या घडीला जेवणाइतके च मतदानाचे महत्त्व आहे.. आणि आपल्याला मिळालेल्या या ताकदीचा प्रत्येकाने वापर करायलाच हवा.

’ प्रचारात कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत असे वाटते?

प्रचार म्हणजे प्रदूषण हे ओघाने आलेच. त्यामुळे प्रचाराच्या जुन्या संकल्पना आता मोडीत काढायला हव्यात. वाहतूक कोंडीसारखी गंभीर समस्या समोर असताना शे-दोनशे कार्यकर्ते, गाडय़ा घेऊ न प्रचारफेरी काढणे योग्य नाही. एकीकडे भोंगे-स्पीकर मोठमोठय़ाने वाजत असतात, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू असतात. प्रसिद्धीसाठी हजारो ‘बॅनर’ रस्त्यांवर झळकत असतात. निवडणुकांनंतर त्याचा कचरा होतो.. आणि प्रदूषणात भर पडत जाते. त्यापेक्षा कामांवर भर दिला तर केवळ समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करूनही घराघरांत पोहोचणे शक्य आहे.

(संकलन : नीलेश अडसूळ)