– धवल कुलकर्णी

सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संभाव्य आघाडीचा विषय आला की अनेक लोकं नाक मुरडतात… शिवसेनेची युती आणि तीही चक्क काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत?

Loksabha Election Jagadish Shettar Karnataka Belgaum BJP Congress
“काँग्रेसमध्ये नातेवाईकांना तिकीट, कार्यकर्त्याला किंमत नाही”; माजी मुख्यमंत्र्याची टीका
Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
No option to Narendra Modi H D Deve Gowda JDS Karnataka Loksabha Election 2024
“विरोधी पक्षनेतेपदाचीही मान्यता नसलेली काँग्रेस सत्तेत काय येणार?” माजी पंतप्रधान देवेगौडांची टीका
bhiwandi east mla rais shaikh resigns
समाजवादी पक्षात भिवंडीवरून धुसफुस; रईस शेख यांचा पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा

परंतु, शिवसेनेच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यावर असं लक्षात येतं, की या पक्षाने एखाद्या कसलेल्या जिम्नॅस्ट अथवा कसरतपटूला लाजवेल अशा पद्धतीने अनेक उड्या कोलांटउड्या मारल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे काही तात्कालिक राजकीय धक्के सोडले तर शिवसेना मांजरी सारखी नेहमीच आपल्या पायावर पडत आलेली आहे.

उदाहणादाखल, मुस्लिम लीग, काँग्रेसचे विविध गट, प्रजा समाजवादी पक्ष, दलित पँथर, ह्यांच्यात काय साम्य आहे, असे विचारले तर अनेक जण बुचकळ्यात पडतील. फार कमी लोकांना माहीत असेल की ह्या राजकीय शक्ती (त्यातील काही आज लोप पावल्या आहेत) कधी काळी शिवसेनेच्या सोबत युती वा आघाडीत होत्या. इतकेच काय, भाजपासोबत सुद्धा शिवसेनेने १९८४ मध्ये अगदी काही काळ घरोबा केला होता. पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर व त्यानंतर उसळलेल्या भीषण दंगलीमुळे आलेल्या लाटेत, ही युती वाहून गेली होती. नंतर, भाजपने सेनेशी काडीमोड घेतला (कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे गाजलेले वाक्य हे त्याच काळातले) पण त्यांचे बंध परत जुळले ते १९८९ मध्ये, ते सुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर. ही युती २०१४ पर्यंत कायम राहिली.

शिवसेनेच्या वाघाने अनेक वेळेला आपले पट्टे बदलले. त्यामागचा विचार एकच राजकारणाची सोय व सोयीचे राजकारण!

तर धांडोळा घेऊया शिवसेनेच्या आत्ता पर्यंतच्या मित्रांचा आणि युतींचा …

इतर राजकीय पक्षांपेक्षा शिवसेनेचे वेगळेपण हे की या पक्षाचा व राजकीय विचारांचा जन्म एका व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून व एका व्यंगचित्राला वाहून घेतलेल्या मासिकातून झाला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी हे माध्यमिक मासिक सुरू केलं ते ऑगस्ट 13, 1960 रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मदिवसा निमित्ताने.

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व अत्रेंचा वाद नंतरच्या काळात इतका प्रचंड वाढला, कि त्या चिखलफेकीचे शिंतोडे अक्षरश: मुंबईतल्या जवळजवळ प्रत्येक मराठी घरात पोचले होते. बाळासाहेबांनी अत्रे यांचा उल्लेख ‘वरळी नाक्यावरचं डुक्कर’ असं करून अत्र्यांच्या चेहऱ्याची साधर्म्य सांगणाऱ्या डुकराचं व्यंगचित्र काढलं होतं हे विशेष.

तसं पाहिलं तर शिवसेनेच्या फक्त दोनच राजकीय भूमिका पहिल्या दिवसापासून कायम आहेत. त्या भूमिका म्हणजे मराठी माणसाचा कैवार तथा देशीवाद व टोकाचा कम्युनिस्ट विरोध.

शिवसेनेच्या जन्माच्या पुढच्या वर्षी, म्हणजे 1967 मध्ये, शिवसेनेने एक महत्त्वाची राजकीय भूमिका घेतली. भारताचे माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी निवडणूक लढवायची होती. परंतु त्या काळात मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट असलेले स. का पाटील, यांनी मेननना उमेदवारी नाकारली व माजी सनदी अधिकारी स. गो. बर्वे यांच्या गळ्यात माळ पडली. शिवसेनेने आपला कधीकाळचा स का पाटील विरोध विसरून (पाटील हे संयुक्त महाराष्ट्राचे व मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याच्या विचाराचे कट्टर विरोधक मानले जायचे) चक्क बर्वे यांना पाठिंबा जाहीर केला.
१९६८. शिवसेनेने आपली पहिली वहिली मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली (ऑक्टोबर 1966 च्या पक्षाच्या पहिल्या सभेमध्ये शिवसेनाप्रमुखांनी राजकारणाचा उल्लेख गजकर्ण म्हणून केला होता हे विशेष). त्यावेळेला शिवसेनेचा मित्रपक्ष होता तत्कालीन प्रजासमाजवादी पक्ष. शिवसेना व प्रजासमाजवादी यांची युती फक्त 1970 पर्यंत टिकली. 1972 मध्ये शिवसेनेला एक नवा मित्र मिळाला तो म्हणजे रा. सु गवई यांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष. उल्लेखनीय गोष्ट अशी की नंतरच्या काळात शिवसेना व दलित पॅंथर यांचा रस्त्यावर टोकाचा संघर्ष झाला. अर्थात नंतरच्या काळात ह्याच दलित पँथरच्या मुशीत घडलेले नामदेव ढसाळ, रामदास आठवले व अर्जुन डांगळे सारखे नेते ‘शिवशक्ती- भीमशक्ती’ चा नारा देऊन शिवसेनेच्या वळचणीला लागले. १९७७ मध्ये सेनेने काही काळ का होईना सेना व पॅन्थर ची युती झाली होती.

1972 मध्ये शिवसेनेचे अजातशत्रू नेते सुधीरभाऊ जोशी हे महापौर झाले तेसुद्धा म्हणे चक्क मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर अर्थात नंतर महापौरांना लीगच्या नगरसेवकांना एक सवलत द्यावी लागली ती म्हणजे सभागृहांमध्ये वंदे मातरम गायले जात असताना तटस्थ राहण्याची! याच मुस्लिम लीगसोबत शिवसेनेने नंतर काही काळ युती केली होती. शिवसेनाप्रमुख व लीगचे तत्कालिन अध्यक्ष जीएम बनातवाला यांनी तर नागपाडामध्ये मस्तान तलावावर चक्क सभा घेतली!

1975 ते 1985 हे दशक शिवसेनेसाठी फार अवघड होतं. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिला. १९७७ मध्ये शिवसेनेच्या एका गटाची मागणी धुडकावून काँग्रेसला पाठिंबा दिला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला व शिवसेनेलाही घरघर लागली. १९८० मध्ये शिवसेनेने बाळासाहेबांचे मित्र असलेल्या बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्रिपदी पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी तर श्रीवर्धन मध्ये त्यांचा प्रचारही केला होता. या पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेनेला विधान परिषदेत काही जागा मिळाल्या.

अर्थात, शिवसेना आणि काँग्रेस यांचा दोस्ताना तसा जुनाच…

1969 च्या काँग्रेसमधल्या ऐतिहासिक फुटीनंतर शिवसेनेने काँग्रेसमधल्या विविध गटांचा, उदाहरणार्थ, इंडिकेट आणि सिंडिकेट, पाठिंबा घेऊन आणि देऊन महापालिकेतल्या राजकारण पार पाडलं होतं. 1977 मध्ये इंदिरा काँग्रेसच्या मुरली देवरांना मुंबईच्या महापौरपदासाठी पाठिंबा देण्याच्या विषयावरून ज्येष्ठ शिवसेना नेते व शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी तर जनता पक्षात प्रवेश केला. ह्यात एक लक्षणीय गोष्ट अशी की शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याला स्टेजवर असणाऱ्या चार लोकांपैकी एक होते ज्येष्ठ काँग्रेस नेते बॅरिस्टर रामराव आदिक (आदिकांना १९७४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत सेनेने पाठिंबा दिला होता).

शिवसेनेची तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत जवळीक होती, त्यामुळे शिवसेनेला ‘वसंतसेना’ हे नाव पडलं होतं, हेही तसं जगजाहीरच आहे. शिवसेनेचे टीकाकार म्हणतात ही काँग्रेसच्या सांगण्यावरून शिवसेनेने कम्युनिस्टांच्या अधिपत्याखाली असलेल्या कामगार संघटना खिळखिळ्या केल्या.

अडचणीच्या गर्तेत सापडलेल्या शिवसेनेला ह्याच काँग्रेसने १९८५ मध्ये नवसंजीवनी दिली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व मुंबई काँग्रेसचे बॉस मुरली भाई देवरा यांच्यात विळा भोपळ्याचा नातं. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तोडण्याचा कट असल्याचा आरोप दादांनी केला. ह्यानंतर निर्माण झालेल्या मराठी माणसाच्या संतापावर शिवसेनेने मुंबई महापालिकेत सत्ता हस्तगत केली. 1992 ते 97 हा अपवाद वगळता शिवसेना या महापालिकेवर सत्ता गाजवते आणि सत्तेच्या जोरावर शिवसेनेचे ‘पारितोषिक राजकारण’ (रिवॉर्ड इकॉनॉमी) चालतं हे विशेष.  अर्थात, ह्याच दशकात (१९८० च्या) शिवसेनेचे काँग्रेस सोबतचे रस्ते दुभंगले…

१९८७ मध्ये झालेल्या विलेपारल्याच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने हिंदुत्वाची झूल अधिकृतपणे पांघरली. त्याच्या आदल्या वर्षी शरद पवार यांनी आपली काँग्रेस (एस) इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केली होती. तेव्हा पवारांच्या मागे असणारा वर्ग हा गावोगावी असणाऱ्या काँग्रेसमधल्या सरंजामशाही नेत्यांशी संघर्ष करत होता. हा बिथरलेल्या वर्ग सेनेसोबत गेला. नंतरच्या काळात शिवसेनेचे नेते म्हणून उदयाला आलेले बसमथचे डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे मूळचे काँग्रेसचे (एस) चे. (१९८२ मध्ये पवार व मुंबईचे बंदसम्राट व सेनेचे कधी काळचे राजकीय विरोधक जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित होते. ह्याच पराना १९९० च्या दशकात बाळासाहेब खास ठाकरी शैलीत मैद्याचे पोते, बारामतीचा ममद्या कसे म्हणत हे लोकांना आठवते…). तर, काळाची पावलं ओळखून भाजपनेते प्रमोद महाजन यांनी सेनेसोबत युतीची पाऊले उचलली. आज भाजपच्या मित्रपक्षांची यादी मोठी असली, तरीसुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर मित्र असलेला शिवसेना हा भाजपचा एकमेव नैसर्गिक मित्र… ही भगवी युती टिकून राहिली 2014 पर्यंत…
आणखी एका गोष्टीची आठवण द्यायची तर 2007 व 2012 ही दोन उदाहरण देता येतील. मराठी राष्ट्रपती हा मुद्दा घेत शिवसेनेनं प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती 2012 मध्ये प्रणब मुखर्जी यांच्याबाबतीत झाली. गमतीचा भाग म्हणजे मित्रपक्ष असलेल्या भाजपानं मुखर्जींना नाही तर पी ए संगमांना पाठिंबा दिला होता. तसंच 2008 मध्येही राष्ट्रवादीशी युती करण्याचा अल्पजीवी प्रयत्न शिवसेनेनं केला होता.

पब्लिक मेमरी इज शॉर्ट असं म्हणतात. शिवसेनेने केलेल्या अश्या आघाड्या ह्या काळाच्या कसोटीवर उतरल्या. पण एवढ्या उलट- सुलट उड्या मारून पण सेना टिकून कशी राहिली? त्याची एक कारण म्हणजे शिवसेनेची कट्टर फौज व दुसरी, पक्षाला नसलेली सैद्धांतिक बैठक.
१९८४. त्याकाळात समाजवादाशी फ्लर्ट करणाऱ्या बाळासाहेबांनी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसेनेची राज्यव्यापी बैठक बोलावली होती. त्याला संबोधित करायला उपस्थित होते ते भारतातील कम्युनिस्टांचे भीष्माचार्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. तेंव्हा डांगे ह्यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मधून हकालपट्टी झाली होती. आपल्या भाषणात डांगे साहेब म्हणाले होते कि, शिवसेनेची सैद्धांतिक बैठक नाही, व त्यामुळे अशी संघटना तग धरणे मुश्किल असते.

खरंच, सत्ता मिळवणं व टिकवणं हाच ह्या पक्षाचा राजकारणाचा पोत व conviction…

कदाचित शिवसेनेचे मर्मस्थान हेच त्यांचे शक्तिस्थळ असावे!

(लेखक राजकीय पत्रकार आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे ग्रंथाचे लेखक आहेत)