दिल्लीतील नेहरू सेंटरमधील बैठकीत माझे काँग्रेसपक्षातील काहीजणांशी तीव्र मतभेद झाले होते. सत्तास्थापनेच्या कारणावरून नाहीतर यासाठी अन्य काही विषय याला कारणीभूत होते. या वादानंतर मी या ठिकाणी बसण्यात काहीच अर्थ नाही या निकषावर आलो होतो. एवढेच नाहीतर या वादावादीतच मी त्या बैठकीतूनही बाहेर पडलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील आदींची उपस्थिती होती. या सर्वांच्या समोरच ती वादावादी झाली होती.  मी निघून गेल्यावर मला कळालं की, अजित पवार यांनी आमच्या सहकाऱ्यांजवळ या काँग्रेसबद्दलची नाराजी व्यक्त केली, जर आताच हे (काँग्रेस) अशाप्रकारची टोकाची भूमिका घ्यायला लागले तर, उद्या सरकार तरी कसं चालणार? काँग्रेसची भूमिका योग्य नाही. म्हणून यामध्ये सहभागी होण्याबाबतीत माझा तीव्र आक्षेप आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं.  या प्रसंगानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय घेतला, असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

याबद्दल अधिक बोलताना पवार यांनी सांगितले की, या घडामोडींना अगोदरची थोडी पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपामधील काहीजणांना वाटत होतं की, आमच्याशी बोलावं. दिल्लीवाल्यांना देखील आमच्याशी बोलावं अस वाटत होतं. निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि काहीजणांशी आमचे चांगले संबंध होते.  या संबंधाच्या पार्श्वभूमीवरच देवेंद्र फडणवीस यांनी काही बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मी जाऊ का? असं अजित पवार यांनी मला विचारलं होतं. यावर मी अजित पवार यांना राजकारणात संवाद ठेवला पाहिजे, असं म्हणत ते काय म्हणतात हे पाहण्यासाठी सांगितलं होतं. ते म्हणतील ते स्वीकारायचं की नाही आपला हा अधिकार आहे.आपण काही त्या रस्त्याने जायचं नाही. मात्र त्यांना काही सांगायाच आहे, काही बोलायचं असेल तर ते ऐकून न घेणं हे योग्य नाही. यानंतर त्यांच्यात जी काही चर्चा झाली असेल कदाचित त्यामध्ये आपण सरकार तयार करू अशी त्यांनी भूमिका मांडली असेल, त्यांनतर एक दोन दिवसांत माझी आणि अजित पवारांची भेट झाली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, देवेंद्र फडणनवीस यांचं काय म्हणनं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यावेळी मी कामात असल्यामुळे आपण नंतर बोलूया असं सांगितलं होतं. तेव्हा फडणवीस यांच्याबरोबर जायचं नाही ही गोष्ट आमच्या मनात होती. मात्र, त्यांचे मत काय हे जाणून घेण्याची आमची इच्छा होती.

दरम्यान दुसऱ्याबाजूने आमची चर्चा वेगाने सुरू होती. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून एकादिवशी मला स्पष्ट सांगण्यात आलं की, आम्ही बरोबर येण्यास तयार आहोत. मला असं वाटतं की जर भाजपापासून शिवसेना बाजूला येणार असेल तर महाराष्ट्रात एक वेगळी स्थिती आपण निश्चित निर्माण करू शकतो. शिवसेनेबाबतची काँग्रेसची नाराजी आपण दूर करू. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एक वाक्यता झाली.

याचदरम्यान अजित पवार यांनी भाजपाला भेटून राज्यपालांना जी यादी दिली होती, ती आमच्या बैठकांना हजर असलेल्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात, त्याच्या तीन ते चार कॉपी आम्ही घेत असतो त्यातील एक कॉपी होती, असं पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड करण्यात आलेली होती. त्यामुळे त्या याद्या त्यांच्याकडे होत्या,त्यातील एक यादी त्यांनी घेतली व नेहरू सेंटरमधील काँग्रेस आणि माझ्यात झालेल्या वादाचा राग डोक्यात ठेवून त्यांनी ती देवेंद्र फडणवीस यांना दाखवून राज्यपालांकडे सुपूर्द केली, त्यानंतर सर्व वेगवान घडमोडी घडल्या. मला मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी अजित पवार यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हीजर आजच्या आज शपथ घेणार असला तर आम्ही हे करणार अन्यथा करणार नाही. त्या क्षणी अजित पवार यांनी हो म्हणून सांगितलं आणि शपथ घेतली. मात्र याबद्दल मला काहीही माहिती नव्हते. मला जेव्हा याबाबत सकाळी सहा वाजता  कळाले तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. माझ्या नावाचा वापर करून अजित पवारांबरोबर असलेल्यांना त्या ठिकाणी नेलेलं असावं, अशी मला त्यांना पाहिल्यानंतर खात्री झाली. अन्यथा ते जाऊच शकत नाही. त्यामुळे आपण हे दुरूस्त करू शकतो. जे घडलेलं आहे हे काही योग्य नाही. ही अत्यंत चुकीची दिशा त्यांनी स्वीकारलेली आहे. हे मोडून काढायचं हे चालू द्यायचं नाही, काय परिणाम व्हायचे असतील ते होतील. मात्र याबद्दल तडजोड करायची नाही, असं मी ठरवलं. त्यानंतर तातडीने पावलं टाकली, मला खात्री होती की दोन ते तीन तासाताच आपण हे दुरूस्त करू शकतो, असं देखील पवार यांनी यावेळी सांगितलं.