सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)

  • निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते?

माझ्या दृष्टीने पारदर्शी व्यवहार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. यापूर्वी आपल्याला फक्त इतक्या कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचे वाचायला मिळत होते. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे आकडे लिहितादेखील येत नाहीत, मग या घोटाळ्यांचा हिशोब कोण देईल? आयकर भरला गेला नाही तर घाबरते. माझ्या कष्टाचे पैसे सुरक्षित आहेत का, असा मला प्रश्न पडतो. तेव्हा राज्याचे सरकार चोख हिशोब देणारे आणि प्रामाणिकपणाला मूल्य असलेले असेच असले पाहिजे ही अपेक्षा आहे.

  • या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात असे वाटते का?

राजकीय पक्षांपेक्षाही माणसं भिडतात असे वाटते. सगळेच नेते पैसे खायला राजकारणात आलेले नसतात. जितकी वर्षे मला मते मिळतील किंवा मिळणार नाहीत तितकी वर्षे आपल्या आसपासच्या बंधू-भगिनींसाठी, प्रशासनासाठी काम करणाऱ्या नेत्यांना समाजाचे पाठबळ मिळायला हवे.

  • तुम्ही उमेदवार असता तर प्राधान्य कशाला दिले असते?

मी निवडणूक लढविली असती तर नागरिकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात जनजागृती करण्याबरोबरच पारदर्शी राहून केलेल्या कामाचा हिशोब द्यायला आवडेल. मेट्रो अमुक हजार कोटी रुपयांमध्ये व्हायला हवी असे सांगितले जाते. पण, ती वेळेत पूर्ण होत नाही. मग खर्च किती वाढतो हे सांगितले जात नाही. टोलच्या आकारणीमध्ये बदल झाला म्हणजे टोल किती काळासाठी घेतला जाणार हे स्पष्ट होत नाही. लांबलेली कामे किती काळात पूर्ण होणार हे सांगितले गेले पाहिजे.

  • नव मतदारांना काय संदेश द्याल?

नव मतदारांना संदेश देण्यापेक्षाही मला त्यांच्याकडून संदेश घ्यायला आवडेल. माझ्या पिढीला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील आणि देशातील नेत्यांविषयी माहिती होती. त्याने मी भारलेली होते. नव मतदारांना अशा स्वरूपाची कोणतीही पाश्र्वभूमी नाही.

  • प्रचारात कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत असे वाटते?

प्रचार हे तंत्र आहे. मला माझाच प्रचार करता आला नाही तर प्रचारात काय टाळायला पाहिजे, असा सल्ला राजकीय पक्षांना मी देऊ इच्छित नाही. प्रचार हा चित्रपटाप्रमाणे चांगला  किंवा वाईट असतो. आशय आवडला तरच आपण चित्रपट पाहायला जातो. कोणी किती चांगले काम केले हे डोळे उघडे ठेवून पाहत आपले भविष्य कोणाच्या हाती सुपूर्द करायचे हे ठरविले पाहिजे. प्रचारातील मुद्दे लोकांना कळतात. त्याला भुलण्याइतके नागरिक दूधखुळे नाहीत हे नक्की जाणवते.

(संकलन- विद्याधर कुलकर्णी)