‘मातोश्री’च्या अंगणातील महापौरांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी

राज्यात सत्तेत पुन्हा येऊन ‘समसमान वाटा’ मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेला पक्षाचे केंद्रस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणात मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले. गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून डावलले गेल्याने अपक्ष लढणाऱ्या तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराजय झाला आणि काँग्रेसच्या नवख्या झिशान सिद्दीकी यांना आमदारकीची ‘लॉटरी’ लागली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या बांद्रा पूर्व मतदारसंघाच्या निवडणुकीकडे या वेळी सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या मतदारसंघात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचे तिकीट आयत्या वेळी कापून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यात आले होते. त्यामुळे खवळलेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला होता. तेव्हापासूनच या मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना असे चित्र उभे राहिले होते. तृप्ती सावंत यांची बंडखोरी मातोश्रीने फारशी गांभीर्याने घेतली नाही, परंतु ही चूक शिवसेनेला महागात पडली. तृप्ती सावंत यांनी या निवडणुकीत तब्बल २३ हजार मते घेऊन शिवसेनेच्या या गडाला भगदाड पाडले. त्यामुळे प्रत्यक्षात मतमोजणीच्यावेळी महाडेश्वर आणि झिशान सिद्दीकी यांच्यातच लढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मतमोजणी केंद्राबाहेर एका टोकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती तर दुसऱ्या टोकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. हळूहळू शिवसेनेची गर्दी पांगली व काँग्रेसची गर्दी वाढू लागली. विजयाची खात्री निर्माण होताच झिशान सिद्दीकी यांचे वडील काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे कुटुंबासह मतमोजणी केंदात हजर झाले. खासदार प्रिया दत्त यादेखील या वेळी उपस्थित होत्या.

तृप्ती सावंत यांनी २४ हजारांपेक्षा अधिक मते घेतली, तर महाडेश्वर यांना ३२ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. शिवसेनेची ही हक्काची ५६ हजार मते विभागली गेली. त्यामुळे ३८ हजार मते मिळवूनही झिशान यांना विजयाची लॉटरी लागली. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीकडे शिवसेनेने आधीपासून फारसे लक्ष दिले नाही. मात्र शिवसेनेतील काही अंतर्गत शक्ती व काँग्रेसनेही तृप्ती सावंत यांना पाठबळ दिले असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर मतदानाच्या दोन दिवस आधी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. मात्र तरीही शिवसेनेला अंगणात पराभव पत्करावा लागला.

वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील समाजमंदिर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला विश्वनाथ महाडेश्वर हे आघाडीवर होते. मात्र चौदाव्या फेरीपासून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी त्यांना मागे टाकले. शेवटच्या १९व्या फेरीपर्यंत महाडेश्वर यांना हा फरक भरून काढता आला नाही.  हे चित्र स्पष्ट झाले तेव्हाच महाडेश्वर हे मतमोजणी केंद्रातून खिन्न होऊन बाहेर पडले. १९व्या फेरीनंतर महाडेश्वर हे तब्बल ५५६७ मतांनी मागे होते. मात्र चार ईव्हीएममधील आकडे दिसत नसल्यामुळे तांत्रिक अडचण झाल्यामुळे या चार मतदार केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठय़ा मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोजणी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाचे चित्र स्पष्ट झालेले असले तरी प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास वेळ लागला होता.

मतविभागणी

झिशान सिद्दीकी (काँग्रेस) – ३८,३३७

विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) – ३२,५४७

तृप्ती सावंत (बंडखोर अपक्ष) – २४,०७१

नोटा – २५४८

एकूण मते – १,२६,५९७